खोडाळा : बाजारात देशी-विदेशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन सहज उपलब्ध होत असताना आदिवासी भागात मात्र आजही पारंपरिक आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या मोहाच्या बियांपासून तयार होणाऱ्या खाद्यतेलाला पसंती दिली जात आहे. आरोग्यासाठी गुणकारी म्हणून आजही मोहाच्या तेलाला वाड्यापाड्यावर महत्त्व दिले जात आहे.
कारेगाव, घोटी येथे घाण्यातून तेल काढण्यासाठी किलोस १५ रुपये घेतात. बिया विक्रीस २० ते ३० रुपये किलोप्रमाणे बाजारभाव आहे. फुलांचा बहर ओसरल्यावर जून-जुलैदरम्यान परिपक्व बिया फोडून उन्हामध्ये वाळवून सुकवतात. घाण्यात बियांचे तेल काढून घरात खाद्यतेल म्हणून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वापर करतात.
आदिवासींच्या घरी व लग्नसोहळ्यात जेवणासाठी या तेलाला पसंती दिली जाते. घाण्यामधून तेल काढल्यावर त्यात कडवटपणा राहतो, तो कमी करण्यासाठी नागलीची पाने टाकून उकळून ते थंड करून साठवतात. सध्याच्या काळात बाजारातील तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे.
बाजारात एक लिटर तेलाची किंमत जवळपास १०० ते १२० रुपयांपर्यंत आहे. परिणामी, महागाईच्या विळख्यात ग्रामीण भागातील जनतेला अडकावे लागत असल्याकारणाने आदिवासी भागात अनेक महिला, पुरुष झाडांच्या खाली जाऊन मोह झाडाच्या फळाच्या बिया गोळा करतात.
निसर्गाकडून वरदान
आदिवासी जनतेला निसर्गाकडून मिळालेले वरदान म्हणजे मोहाचे झाड आहे. मोहाच्या बहुगुणी उपयोगाने आदिवासी समाजाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत मानले जाते. आदिवासी लोकांच्या अनेक विधी-परंपरामध्ये मोहाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. मोहाच्या फळामध्ये फणसाच्या बियांप्रमाणे गडद रंगाच्या बिया असतात. या बियांपासून तेल काढले जाते. जेवण बनविण्यासाठी याचा उपयोग आदिवासी जमातींमध्ये केला जातो. मात्र, हे तेल फक्त जेवणापुरते मर्यादित नसून याचा औषध म्हणूनही उपयोग होतो.
बाजारात मिळणारे भेसळयुक्त तेल आम्ही वापरत नाही. भेसळयुक्त तेलामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. बाजारातील तेलापेक्षा पारंपरिक मोहठ्याचे तेल वापरल्याने कोणतेही आजार होत नाहीत. - मधुकर पाटील
'मोहा'च्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे आदिवासींची जीवनशैली पाहताना अधिक वयोमान, नेत्र व हृदय ठणठणीत राहते. याला तेल हेही एक कारण आहे. - डॉ. कविता उपाध्ये, आयुर्वेदतज्ज्ञ