महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कांद्याचे उत्पादन देशातील एक महत्त्वाचे कृषि उत्पादन आहे. परंतु कांद्याच्या भावात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता दिसून आली आहे.
ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कांद्याच्या विक्रीतून योग्य भाव मिळवणे कठीण झाले आहे.परिणामी आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कांद्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करणे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि फायदेशीर पर्याय होऊ शकतो.
कांद्याची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी आधुनिक मार्ग
कांद्यावर प्रक्रिया करण्यामुळे शेतकऱ्यांना स्थिर आणि उच्च भाव मिळवण्याची हमी मिळते. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटाने असे प्रक्रिया उद्योग उभारणे फायद्याचे ठरेल.
अशी करा कांदा निर्जलीकरण प्रक्रिया
कांदा निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये कांद्याचे छोटे तुकडे करून त्यांना ड्रायरद्वारे किंवा उन्हात वाळवले जाते. वाळवलेले कांद्याचे तुकडे नंतर ग्राइंडरमध्ये दळून कांदा पावडर बनवली जाते. सदरील पावडर बाजारात मसाले किंवा फूड प्रोसेसिंग उद्योगांना विकली जाते.
प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी भांडवल
• कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे १.५ लाख ते ५ लाख रुपये भांडवल लागते. यामध्ये कांदा कापण्यासाठी कटिंग मशीन, कांदा वाळवण्यासाठी सोलर ड्रायर, आणि पावडर तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीन आदींची आवश्यक असतात.
• याशिवाय पॅकेजिंग मशिन आणि इतर साधनांची आवश्यकता भासते.
• तसेच सौर ऊर्जा ड्रायर सारख्या पर्यावरणपूरक उपायांचा वापर करून खर्चही कमी करता येऊ शकतो.
विक्रीसाठी पर्याय
कांद्याची प्रक्रिया करून तयार होणारा माल मसाले कंपन्यांना, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, तसेच वेफर्स आणि स्नॅक्स उत्पादक कंपन्यांना विकता येऊ शकतो. मसाले उद्योगात कांदा पावडरचा वापर अधिक होतो तसेच वेफर्स कंपन्यांमध्ये कांद्याचे स्वाद असलेले स्नॅक्स तयार करण्यासाठी देखीलवापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेतकऱ्यांनी अशा उद्योगांसोबत भागेदारी (टायअप) करून आपला माल विक्रीसाठी पुरवला तर त्यांना अधिक चांगला नफा मिळवता येईल.
आर्थिक समृद्धीचा मार्ग
कांदा प्रक्रिया उद्योग हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचा एक महत्त्वाचा स्त्रोत ठरू शकतो. कांद्याच्या उत्पादनावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना कांदा अधिक चांगल्या भावात विकता येईल. यासाठी योग्य भांडवल, साधने आणि विक्रीच्या संधींचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी या उद्योगाची दिशा ठरवली पाहिजे.