रत्नागिरी : हवामान खात्याने पावसाचे संकेत देताच पावसाळ्यातील मासेमारीला १ जून ते ३१ जुलैपर्यंत मत्स्य विभागाकडून मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मासेमारीबंदीमुळे चालू हंगामातील मासेमारीला आता केवळ १३ दिवसच उरले आहेत. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पावसाचे आगमन लवकर होत असल्यामुळे या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जून ठेवण्यात आला आहे.
तसेच पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे आगमन उशिरा होत असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी केली आहे.
या बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास कारवाई होणार आहे. या आदेशानुसार, परवानाधारक बिगरयंत्रचलित नौकांना मासेमारीसाठी मुभा दिली आहे.
मच्छीमार सहकारी संस्थांना पत्र
समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक आहे. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत कोणालाही समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही, असे मत्स्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी करू नये, अशी सूचना जिल्ह्यातील ८५ मच्छीमार सहकारी संस्थांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.
हे आहेत नियम
• पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील.
• पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयंत्रचलित नौकांना बंदी नाही.
• सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना मासेमारीबाबतचे धोरण लागू राहील.
• बंदी काळात मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), २०२१च्या कलम १४ अन्वये कारवाई होणार.
• बंदी कालावधीत मासेमारी करताना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेला अपघात झाल्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार नाही.
• बंदी कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना अवागमन निषिद्ध आहे.
अधिक वाचा: खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट