मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी २१ व्या पाळीव पशुगणनेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज २५ जून २०२४ रोजी ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन ऊर्फ लालन सिंह उपस्थित राहणार आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २१ व्या पाळीव पशुगणनेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे मोबाईल अॅप व सॉफ्टवेअरसह उपकरणांचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.
गणनेच्या प्रक्रियेत अचूक माहिती गोळा करण्यासाठी पद्धती आणि पाळीव जनावरांच्या नोंदणीकृत जातींची ओळख कार्यशाळेत सहभागींना करून दिली जाणार आहे.
वर्ष १९१९ मध्य पाळीव पशुगणनेला सुरुवात झाल्यापासून दर पाच वर्षांनी होणारी ही गणना पशुपालनाच्या क्षेत्रात धोरणांची निर्मिती आणि विविध योजनांनी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आली आहे.
गणनेचा भाग म्हणून दारोदारी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामार्फत देशभरातील पाळीव पशुपक्ष्यांबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाते. २१ वी पाळीव पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे.
या प्रक्रियेत मोबाईल व प्रसारण तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील माहिती अचूक व परिणामकारकरित्या माहिती संकलन केले जाईल.