पुणे : राज्यात २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, शुक्रवारापासून (दि. २५) पशुगणना सुरू होणार असून, ती २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
त्यासाठी राज्यभरात सुमारे ९ हजार प्रगणक व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात अॅपद्वारे करण्यात येणार आहे.
पशुगणनेमुळे राज्यातील पशुधनाची संख्या निर्धारित होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल. तसेच योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
यात राज्यातील नागरी व ग्रामीण भागात आढळणाऱ्या एकूण १६ पशुधन जाती व कुक्कुटादी पक्षी यांची प्रजातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
राज्यासह दमण व दीव आणि दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील राज्य पशुगणना अधिकारी, जिल्हा पशुगणना अधिकाऱ्यांना पशुगणनेसाठी विकसित मोबाइल अॅप, वेब आधारित आणि डॅशबोर्ड निरीक्षण याविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
देशात १९१९-२० पासून पशुगणनेस सुरुवात झाली. तेव्हापासून दर ५ वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे. २०१९ मध्ये २० वी पशुगणना झाली होती. यानुसार राज्यामध्ये एकूण ३ कोटी ३० लाख ८० हजार इतके पशुधन होते.
त्यापूर्वीच्या पशुगणनेच्या तुलनेत त्यात १.८३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती. पशुधनामध्ये देशामध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तसेच कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी यामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे.
कोणकोणत्या पशुधनाची होणार गणना
पशुधनामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, गाढवे, घोडे, शिंगरे, खेचरे व उंट यांची गणना केली जाणार आहे. तर कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये कोंबड्या, बदके, टर्की, क्चेल, शहामृग, गिनी, इमू, हंस तसेच तसेच पाळीव कुत्रे, हत्ती व ससे आणि भटक्या गायी व कुत्रे यांचीदेखील गणना करण्यात येणार आहे.
अखेर मुहूर्त मिळाला
राज्यात २१ वी पशुगणना १ सप्टेंबरपासून सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. त्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुढील वर्षाच्या फेब्रुवारी-अखेरपर्यंत ही पशुगणना सुरू राहणार आहे. त्यासाठी राज्यभरात ७ हजार ७६२ प्रगणक व १ हजार ४५३ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.