21st livestock census : आपल्या देशातील जनतेची जशी जनगणना केली जाते तशीच पाळीव पशुंची देखील जनगणना केली जाते. यंदाच्या वर्षी २१ वी पशुगणना केली जाणार आहे. त्याचे उद्घाटन उद्या (२५ ऑक्टोबर रोजी) नवी दिल्ली येथे होणार आहे. '21 Live Stock census' या नावाने ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.
त्यासाठी मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी यावर्षी होणाऱ्या पाळीव पशुगणनेसाठी महत्वाच्या कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना ऑगस्ट महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम २६ ते २९ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला होता.
या कार्यशाळेमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना 21 Live Stock census या ॲप्लिकेशनची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यात विविध प्रकारच्या पशुंसाठी त्याच्या प्रकारानुसार प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.
यात मुख्यत: दुधाळ जनावरे आणि गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह असे विभाग करण्यात आले आहे. त्या प्रकारानुसार प्रगणकांनी अचूक माहिती भरावी लागणार आहे. यंदा २१ वी पशुगणना केली जाणार आहे. पशुगणनेसाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज आहे.
२१ व्या पशुगणनेसाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. यंदा प्रगणकांना मोबाइलवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. त्यासाठी शासन प्रगणकांना मानधन, मोबाइल वापराचा वेगळा मोबदला देण्यात येणार आहे. पशुगणनेंतर्गत ग्रामीण भागात, मनपा व नगरपालिका या शहरी भागातील पशुंचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
२१ वी पशुगणना मोबाईल ॲपद्वारे होणार
पशुगणनेमध्ये पाळीव पशुंची माहिती आणि आकडेवारी अचूक प्राप्त व्हावी, यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपचा वापर कसा करावा? याची माहिती आयोजित कार्यशाळेत प्रगणकांना देण्यात आली आहे.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२५ या दरम्यान होणार गणना
२१ वी पशुगणना ही साधारणत: नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. या गणनेसाठी प्रथमच मोबाईल अॅपचा वापर करण्यात आला असून देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील पशुंची अचूक माहिती गोळा केली जाणार आहे. त्यासाठी शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
१९१९ मध्ये झाली पहिली पशुगणना
सन १९१९-२० पासून देशात पशुगणनेस सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत २० पशुगणना मोहिम आयोजित करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ही गणना दर ५ वर्षांनी एकदा केली जाते. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने आतापर्यंत अशा २० जनगणना केल्या आहेत. पशुगणना केवळ धोरणकर्त्यांसाठीच नव्हे तर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, दुग्धउद्योग आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पशुगणना पशुंसाठी उपयोगी
पशुगणनेच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या प्रकारातील किती पशु आहेत. याची संपूर्ण माहिती मिळेल. त्यानुसार येत्या काळात लसीकरण मोहिम, औषध, गोळ्याची मागणी आणि पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. भविष्यात त्यातच तुलनेत साठवणूक करण्याचे नियोजन पशु विभागाला करण्यास सोपे जाणार आहे. त्याचा उपयोग पशुंना नक्की होईल.
या मोहिमेत 'या' जनावरांची गणना
गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, घोडा, उंट, कुत्रा, कोंबडी, गाढव यांची गणना केली जाणार आहे. मागील पशुगणनेत जिल्ह्यात गाय वर्ग- ५ लाख ३४ हजार ३९४, म्हैस वर्ग- ९२ हजार ४९४, शेळ्या- ४ लाख १५ हजार २१९, मेंढ्या ८७ हजार २४०, वराह- १० हजार ६४६, असे एकूण ११ लाख ३८ हजार ९९३ पशुधन गणना झाली होती.
अचूक माहिती द्या
पशुगणनेसाठी पशुपालकांनी अचूक माहिती द्यावी तसेच या मोहिमेसाठी पशुपालकांनी प्रगणकांना सहकार्य करावे. - गणेश देशपांडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छ. संभाजीनगर
दिवाळीनंतर कामाला सुरुवात
प्रत्यक्षात आपल्या विभागात पशुगणनेचे काम हे दिवाळीनंतर सुरु होणार आहे. या मोहिमेसाठी गावातील पशुपालक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनी प्रगणकांना सहकार्य करावे. - डॉ. एन .एस. कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर
यांची नेमणूक करण्यात आली
पशुगणनेसाठी मराठवाड्यातील ४ विभागात ७६५ प्रगणक आणि १७३ पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात १८४ तर शहरी भागात ७१ प्रगणक तर ग्रामीण भागात ३७ तर शहरी भागात १८ पर्यवेक्षक, जालना जिल्ह्यात ग्रामीण भागात १३९ तर शहरी भागात २४ प्रगणक तर ग्रामीण भागात २७ तर शहरी भागात १० पर्यवेक्षक, परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात ९२ तर शहरी भागात २९ प्रगणक तर ग्रामीण भागात २० तर शहरी भागात ५ पर्यवेक्षक, बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात १९२ तर शहरी भागात ३४ प्रगणक तर ग्रामीण भागात ४४ तर शहरी भागात १२ पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.