देशामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या गाईंचे संवर्धन होण्यासाठी उत्तराखंड लाइवस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड डेहराडून, ॲनिमल ब्रीडिंग फार्म कालसी येथील उंच वंशावळीचा वळू (१८९२३३) "बद्री" याचा वापर आता देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात करण्यात येणार आहे. हा वळू भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. या वळूच्या आईचा पैदास नोंदणी क्रमांक २२९/३०७ असून तिची दूध उत्पादन क्षमता ३२०५ लिटर प्रतिवेत इतकी आहे.
वळूच्या वडिलांचा पैदास नोंदणी क्रमांक आर् एस् १०००९ असून तो दुग्धोत्पादन क्षमतेनुसार फाईव्ह स्टार (पंच तारांकित) रेटिंग मधील वळू आहे. वळूच्या वडिलांच्या आईची दूध उत्पादन क्षमता ५३५४ लिटर प्रतीवेत इतकी आहे अशी माहिती डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी दिली.
कालसी, डेहराडून, उत्तराखंड इथे देशातील लाल सिंधी गोवंशावर संवर्धन व प्रजनन करणारे एकमेव केंद्र आहे. येथील उच्च वंशावळीच्या लाल सिंधी गायी व वळूंना देशातील विविध संस्था व शेतकऱ्यांकडून प्रचंड मागणी असते व ते सहज उपलब्ध होत नाहीत, हे विशेष!
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाच्या साह्याने सन २०२० पासून चालू झालेले आहे. या संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी गाईंचे संवर्धन करून त्यांचा महाराष्ट्रातील वातावरणामध्ये तुलनात्मक अभ्यास करणे असा आहे.
सध्या या संशोधन केंद्रामध्ये या प्रत्येक जातीचा उच्च दर्जाचा वळू, त्या गोवंशाच्या संशोधन केंद्रामधून किंवा पैदास क्षेत्रामधून घेतला आहे व त्या माध्यमातून पुढील पिढी सुधारण्याचे काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर या संशोधन केंद्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान जसे की भ्रूण प्रत्यारोपण (एम्ब्रियो ट्रान्सफर), लिंग निर्धारित वीर्य (सेक्स सॉरटेड सिमेन), इ. यांचा वापर करून जातीवंत वंशावळीच्या गाई तयार करायचे कार्य विद्यापीठ प्रक्षेत्र व शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये चालू आहे.
अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली. सदर प्रकल्प डॉ. सुनील गोरंटीवार, संचालक संशोधन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे.
भारतात सन् २०१९ च्या पशु गणनेनुसार साधारणतः ६,१२,९०० शुद्ध लाल सिंधी गायी उपलब्ध आहेत. एकूण गाईंच्या संख्येच्या फक्त ०.४ % इतक्याच लाल सिंधी गायी शिल्लक आहेत. पुणे कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये १८८७ साली (१३७ वर्षापूर्वी) लाल सिंधी गाईंचे संवर्धन व संगोपन केले जात असे व त्यातून उत्पादित होणारे दूध पुणे विभागातील अधिकाऱ्यांना पुरविण्यात येत असे.
सन् १९६० नंतर देशामध्ये गायींच्या विदेशी जातींचा संकरीकरण कार्यक्रम (क्रॉस ब्रिडिंग प्रोग्राम) राबविणेत येऊ लागले नंतर येथील लाल सिंधी गायींचा कळप कृषी महाविद्यालय, धुळे येथे हलविण्यात आला. सध्या धुळे येथे ५० लाल सिंधी गाई आहेत अशी माहिती डॉ. धीरज कंखरे, संशोधन केंद्राचे तांत्रिक प्रमुख यांनी दिली.
देशामध्ये सध्या शुद्ध देशी गाईंची टक्केवारी फक्त २९.५% इतकी कमी आहे. उर्वरित ७०.५% गाई या गावठी स्वरूपात आढळतात. त्यासाठी आपल्याला देशातील गोवंशांचे व गाईंचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. सध्या भारतामध्ये सहिवाल, गीर, राठी या गाई काही प्रमाणात शेतकऱ्यांना मिळत आहेत, परंतु लाल सिंधी व थारपारकर गाई देशांमध्ये अगदी नगण्य प्रमाणात आढळत असल्याने त्या शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.
"बद्री" लाल सिंधी वळूचा उपयोग देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडे उपलब्ध असणाऱ्या लाल सिंधी गोवंशाच्या गाईंचे पैदास कार्यक्रमामध्ये वापर करणेत येणार असून त्यामुळे उच्च वंशावळीच्या चांगल्या दुग्ध उत्पादन क्षमतेच्या कालवडी, गायी व वळू केवळ संशोधन केंद्रासच नव्हे तर राज्यातील इतर संस्था व शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे.