महाराष्ट्रात व कर्नाटकात पोळा सण साजरा करून या दिवशी बैलांची पूजा केली जाते. या सणास दक्षिण महाराष्ट्रात ‘बेंदूर’ असेही म्हणतात. या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते, अशी समजूत आहे. आज राज्यात पोळा आणि बेंदूरचा उत्साह असतानाच विदर्भातील एका गावात मात्र वेगळ्या पद्धतीने पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. आज सायंकाळच्या सुमारास हा पोळा साजरा होणार आहे.
अशी आहे परंपरा
अकोट या ठिकाणी बैलाप्रमाणे गाढवाची पूजा करून पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोकजीवनातील बैलपोळा हा सण शेतकरी बैलांच्या शेतीसाठी राबणाऱ्या उपकारांची कृतार्थता प्रगट करण्यासाठी साजरा करतात. आपणावर केलेल्या उपकारांचे मूल्य परत करता येत नाही म्हणून त्याची परतफेड कृतज्ञतेमधून केली जाते. गाईसाठी ‘गाईगोंधन’, गुराढोरासाठी ‘झेंडवाई’ तर बैलासाठी ‘बैलपोळा’ हे सण लोक साजरे करतात. पोळ्याच्या दिवशी बैल हा नुसता बैल न राहता तो नंदीबैल होतो. त्याच रितीने ज्यांची उपजीविका ही गाढवांवर अवलंबून आहे ते लोक ‘गाढवांचा पोळा’ साजरा करतात. अकोला जिल्ह्यातील अकोट या गावी ही परंपरा सुरू झाली आहे. विशेषत: येथील भोई समाजातील लोक गाढवांची पूजा पोळ्याच्या दिवशी करतात.
भोई समाजाने ज्या गाढवांना देवत्व बहाल केले, त्या गाढवाला मात्र प्राचीन परंपरेने नेहमी अप्रतिष्ठित मानले आहे. अकोट या शहरात मात्र भरविला जाणारा गाढवांचा पोळा अप्रतिष्ठेचा मानला जात नाही. गाढवाच्या जीवावर उपजीविका करणारे गधाभोई या समाजाचे लोक गाढवाच्या पाठीवर ओझे लादून माल वाहण्याचे काम करतात. गाढवाच्या मदतीने आपली उपजीविका चालवितात. त्यांना दररोज उपजीविकेसाठी मदत करणाऱ्या गाढवाची ते बैलाप्रमाणे पूजा करतात. श्रमाला महत्व देणारे भोई समाजाचे लोक गाढवांच्या श्रमालाही पूजनीय मानतात. हे या श्रम करणाऱ्या संस्कृतीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य मानावे लागेल.
असा साजरा होतो गाढवांचा पोळा
गाढवांचा पोळ्याच्या दिवशी गाढवाला आंघोळ घातली जाते. त्याला बैलाप्रमाणे सजविले जाते. वेगवेगळ्या रंगाने रंगविले जाते. संध्याकाळी सर्व गाढवांना एका ठिकाणी उभे करून त्याची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते. घरात बनविलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. गाढवांना ठोंबरा (भिजवून ठेवलेल्या ज्वारीचा कणखीचा गोळा) खाऊ घातला जातो. पुरुषाप्रमाणे घरातील गृहिणी आपल्या घरच्या गाढवाची भक्तिभावाने पूजा करतात.