poultry :
नागपूर : भारतीय पोल्ट्री विज्ञान संघटना (आयपीएसए) च्या वतीने नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय (माफसू) येथे आज (१६ ऑक्टोबर) पासून ते १८ ऑक्टोबरदरम्यान कुक्कुटपालन व्यवसायावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. ए. पी. सोमकुवर व सचिव डॉ. एम. एम. कदम यांनी दिली.
आज सकाळी १० वाजता परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. आयपीएसएचे अध्यक्ष डॉ. अजित रानडे, पशुविज्ञान शिक्षण संचालक व अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्यासह या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयबी ग्रुपचे संस्थापक बहादूर अली, वेंकीस ग्रुपचे प्रमुख सल्लागार डॉ जी एल जैन, माफसूचे कुलगुरू डॉ नितीन पाटील यांची उपस्थिती होती.
सिम्पोजियम नावाने आयोजित वार्षिक परिषदेत कुक्कुटपालन विकास या महत्त्वाच्या विषयांवरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहे.
या परिषदेत २५० हून अधिक नामवंत शास्त्रज्ञ, विद्यार्थी, पोल्ट्री उद्योजक सहभागी होत आहेत. भारतीय कुक्कुटपालन क्षेत्रातील पोषक वातावरण तसेच पोल्ट्री व्यवस्थापन, आरोग्य, लस, प्रक्रिया, अर्थशास्त्र आणि उद्योजकता या विषयी संबंधित चर्चा या परिषदेत करण्यात येणार आहे.
उद्योग संवाद
पोल्ट्री प्रक्रिया परिषदेच्या विविध सत्रात कुक्कुटपालन उत्पादकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सोडविण्यासाठी शेतकरी आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे.
भारत हा जगातील सातवा मोठा ब्रॉयलर उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा अंडी उत्पादक देश आहे. पोल्ट्री उद्योग ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणावर शाश्वत उपजीविका आणि रोजगार निर्माण करत आहे. भारतीय पोल्ट्री विज्ञान संघटना आता भारतातील पोल्ट्री उद्योगाचा प्रचार आणि कल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.