परस बागेमध्ये कुक्कुटपालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. यामुळे शेतकऱ्यांना अंडी आणि मांस मिळू शकते, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे शेतकर्यांनी परस बागेमध्ये कुक्कुटपालन करावे. तसेच याद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील समुदायाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील सन २०२३-२४ करिता केंद्र शासन पुरस्कृत विशेष अनुसूचित जाती उपघटक प्रकल्प कृषी विज्ञान केंद्र बदनापूर द्वारे राबविण्यात येत असल्याचे डॉ डी. एन गोखले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना कृषी विज्ञान केंद्र बदनापूर द्वारे आयोजित परस बागेतील कुक्कुटपालन एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात संगितले.
तसेच यावेळी डॉ. बी. सी. अंधारे, सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, बदनापूर यांनी उपस्थिती शेतकऱ्यांना परस बागेतील कुक्कुटपालनाचे तंत्रज्ञान, जाती निवड, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन आणि विपणन या विषयांवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सविस्तर माहिती दिली.
भा.कृ.अनु.प., पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अनुसूचित जाती उपघटक (SCSP) प्रकल्पांतर्गत शुक्रवारी (दि.२२) रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मौजे चनेगाव (ता. बदनापूर) येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील एकुण ४० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊस उत्पादनाचा ब्रॅंड
कार्यक्रमाचे उद्घाटन वनामकृवि परभणीचे संचालक विस्तार शिक्षण, डॉ. डी. एन. गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत बदनापूर कॅंपसचे अधिकारी डॉ. आर. डी. अहिरे, डॉ. एस. जी. पाटील, डॉ. के. टी. जाधव, डॉ. एस. डी. सोमवंशी, बदनापूर तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. स्मिता अडलक व तेजस जनविकास संस्था, जाफराबाद चे संस्थापक अध्यक्ष एस. डी तायडे आणि बिस्मिल्ला सय्यद संस्थापक अध्यक्ष सहारा सामाजिक विकास संस्था, भोकरदन यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फारुक तडवी, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी केले. सदरील प्रास्ताविकात त्यांनी केंद्र शासन पुरस्कृत विशेष अनुसूचित जाती उपघटक प्रकल्पा बाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. आर. एल. कदम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. एस. डी. तायडे यांनी केले.