राज्यातील काही जिल्ह्यांत कुक्कुट पक्षांवर बर्ड फ्लू (Bird Flu) आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात तूर्तास कोणत्याही प्रकारचा धोका नसला, तरी पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर (Alert Mode) आला आहे. पोल्ट्री फॉर्ममध्येच (Poultry Farm) बर्ड फ्लू रोखण्यासाठी १६ शीघ्र दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे.
कुक्कुट पालन केंद्रातील प्रत्येक बाबींवर शीघ्र दक्षता समितीची करडी नजर राहणार आहे. 'बर्ड फ्लू'चा सर्वाधिक फटका कुक्कुटपालन व्यावसायिकांना सहन करावा लागतो.
२००४-०५ व २०२१-२२ मध्ये 'बर्ड फ्लू' आला होता. या कालावधीत अनेक पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले. काहींवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. आता बर्ड फ्लूचा शिरकाव काही जिल्ह्यांत झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कुक्कुट पालन केंद्रातील पक्षी सुरक्षित आहे. संसर्गजन्य आजार असल्याने बर्ड फ्लूची लागण झाल्याने कुक्कुट पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो.
जिल्ह्यात अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली नाही. बर्ड फ्लूला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने कुक्कुट पालन व्यावसायिकांना दिले. ५० हजार पक्षी क्षमतेचे जिल्ह्यात आहेत पोल्ट्री फार्म आहेत.
कुक्कुट पालन केंद्रात स्वच्छता ठेवावी, वेळोवेळी निर्जतुकीरण करावे, जैवसुरक्षा कटाक्षाने पाळण्यात यावी आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पोल्टी फॉर्ममध्ये 'एन्ट्री' देऊ नये, कुक्कुट पक्षांचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती पशुचिकित्सकांना देण्यात यावी, सॅम्पल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देश पोल्ट्री व्यावसायिकांना दिले.
४० पोल्ट्रीत दहा लाख पक्षी
जिल्ह्यात पोल्ट्री फॉर्मची संख्या ४० असून, कुक्कुट पक्षांची क्षमता दहा लाख इतकी आहे. उद्योग म्हणून ४० ते ५० हजार पक्षी क्षमतेचेही पोल्ट्री फॉर्म आहेत. सध्या सर्व कुक्कुट पक्षी सुरक्षित आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. परंतु यापूर्वी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. सध्या नुकसान होऊ नये यासाठी व्यावसायिक खबरदारी घेत आहेत.
जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण कुठेही झाली नाही. दक्षता म्हणून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात १६ शीघ्र दक्षता समिती आहे. कुक्कुट पालन व्यावसायिकांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अंडी व चिकन उकळून सेवन करावे. - डॉ. विजय रहाटे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ