वाशिम : राज्यात 'बर्ड फ्लू'मुळे (Bird Flu) टेन्शन वाढले असून, 'हाय अलर्ट' (High alert) जारी करण्यात आला आहे, अशातच कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ७ हजार ५५२ कोंबड्यांचा २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान मृत्यू झाला.
कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) येथे 'बर्ड फ्लू'ने (Bird Flu) तब्ब्ल ७ हजार ५५२ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रयोगशाळेने २७ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला दिलेल्या पत्रातून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी 'बर्ड फ्लू'चा (Bird Flu) प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संसर्ग माणसाला होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नियुक्त केल्या आहेत.
अकोला येथील प्रयोगशाळेकडून येथील मृत पक्ष्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानकडे पाठविले. तेथून हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेच्या तपासणीत कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'ने झाल्याचे निष्पन्न झाले.
कसा होतो 'बर्ड फ्लू'?
बर्ड फ्लूचा (Bird Flu) संसर्ग कोंबड्या, मोर, टर्की, मोर अशा पक्ष्यांमुळे अधिक पसरतो. काही जणांना या आजाराबाबत कळूनही येत नाही आणि मृत्यूचा धोकाही संभवतो. आतापर्यंत एच५ एन१ आणि एच७ एनर यांना 'बर्ड फ्लू'चे (Bird Flu) प्रकार मानले जाते होते. मात्र, आता या यादीत एच ५ एन ८चा देखील समावेश झालेला दिसून येत आहे. डोळे, कान, तोंडाद्वारे व्हायरसचे संक्रमण होऊन हा आजार होतो.
ही आहेत 'बर्ड फ्लू'ची लक्षणे
ताप आणि नेहमी कफ राहणे, नाक वाहणे, डोके दुखत राहणे, घशात सूज असणे, पोटात जंत होणे, सतत मळमळ आणि उलटीसारखे वाटणे, श्वासाचा त्रास, निमोनियासारखे वाटणे, डोळ्यांना त्रास
ही घ्या खबरदारी
* संक्रमित पक्षी, त्यांच्या विष्ठेशी किंवा पिसांशी जवळचा संपर्क टाळा.
* जंगली पक्षी, कुक्कुटपालन, इतर पाळीव पक्षी आणि इतर वन्य किंवा पाळीव प्राण्यांसह आजारी किंवा मृत प्राण्यांचा संपर्क टाळा.
* 'बर्ड फ्लू'सारखी लक्षणे दिसल्यासर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
* संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा.
समितीमध्ये कोणाचा समावेश?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, बर्ड फ्लू नियंत्रणासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीत सदस्य सचिव म्हणून पशुधन विकास अधिकारी (वि.), तसेच सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, संबंधित संस्थाप्रमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी, उपअधीक्षक, भूमी अभिलेखाचे तालुका निरीक्षक यांचा समावेश असणार आहे.
खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे मृत पक्ष्यांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेमार्फत आधी पुणे येथे, तर तेथून हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यामध्ये पक्ष्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'ने झाला असल्याचे आढळून आले. - डॉ. प्रवीण वनवे, पशुधन विकास अधिकारी, कारंजा.
खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचा 'बर्ड फ्लू'ने मृत्यू झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांचे गठणही तत्काळ करण्यात आले. - बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकारी, वाशिम
हे ही वाचा सविस्तर : Bird flu: कावळ्यांद्वारे 'बर्ड फ्ल्यू' धडकला ! काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर