Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > कुक्कुटपालन व्यवसाय करताय तर हे करू नका

कुक्कुटपालन व्यवसाय करताय तर हे करू नका

Don't do this if you are running a poultry business | कुक्कुटपालन व्यवसाय करताय तर हे करू नका

कुक्कुटपालन व्यवसाय करताय तर हे करू नका

कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत.

कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत.

शेअर :

Join us
Join usNext

कुक्कुटपालन नवीन व्यवसाय सुरु करत असाल अथवा आपण कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल तर पक्षांच्या सुरक्षेसाठी आणि एकूणच आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी काही नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याविषयी थोडक्यात माहिती पाहूया.

  • आपल्या फार्मवर काम करणाऱ्या कामगारांशिवाय इतर नवीन माणसांना येण्यास प्रतिबंध घालावा, तसेच आपल्या फार्मवरील कामगारांना दुसऱ्यांच्या फार्मवर जाण्यासही प्रतिबंध घालावा, यामुळे एका फार्मवरील रोग दुसऱ्या फार्मवर पसरणार नाहीत.
  • पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छ व निर्जंतुक कपडे, पादत्राणे वापरूनच प्रवेश द्यावा तसेच पक्षी हाताळताना व पक्ष्यांचे लसीकरण करतेवेळी हात निर्जंतुक असावेत.
  • पक्षी, खाद्य व इतर उपयोगी सामान वाहतूक करणाऱ्या वाहनास व त्यातील कामगारास प्रक्षेत्रामध्ये येण्यास प्रतिबंध घालावा. पोल्ट्री फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ जंतुनाशक द्रावणाचे फवारे, तसेच जंतुनाशकाने भरलेले पाय बुडविण्याचे भांडे (फूट डीप्स) ठेवावेत.
  • वाया गेलेले ब्रुडर्स व खाद्याची रिकामी झालेली पोती यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.
  • वाया गेलेले खाद्य, खराब झालेले लिटर, विष्ठा इत्यादी शेडजवळ टाकू नयेत, यासाठी प्रक्षेत्रावर वेगळा खड्डा करून त्यामध्ये टाकावे. अशा खड्डयामध्ये निर्जंतुकीकरणासाठी त्याचे द्रावण अथवा पावडर टाकावी.
  • मृत पक्ष्यांच्या शवविच्छेदनासाठी प्रक्षेत्राबाहेर एक स्वतंत्र कक्ष असावा. शवविच्छेदनानंतर मृत पक्षी जाळून अथवा पुरून टाकावेत.
  • प्रक्षेत्रावरील उंदरांचा, माश्यांचा, इतर पक्ष्यांचा व जंगली श्वापदांचा प्रतिबंध करावा. फार्मच्या बाहेरील जागेत किमान ३० फूट अंतरापर्यंत निर्जंतुक द्रावणाचा फवारा मारावा.
  • आजारी पक्षी योग्य वाढ न झालेले पक्षी व अशक्त पक्षी वेगळे काढून त्यांना खाद्य व औषधोपचार करावा. शक्यतो असे पक्षी लवकर काढून टाकावेत.
  • रोग निदानासाठी आजारी पक्षी अथवा मृत झालेले पक्षी जवळच्या प्रयोगशाळेत पाठवावेत, पशुवैद्यकाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
  • आपण घेतलेल्या पक्ष्यांना अंडी उबवणी केंद्रामधूनच मॅरेक्स या रोगाची लस दिली आहे किंवा कसे, तसेच अंडी उबवणी केंद्रामध्ये मादी पक्ष्यांची साल्मोनेल्ला या विषाणूंची चाचणी त्या पक्ष्यांच्या १६ व २० व्या आठवड्यात नियमितपणे केली जाते किंवा कसे याबाबत खात्री करून घ्यावी. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सर्व लसीकरण करून घ्यावे.
  • आपल्या फार्मवरील पक्ष्यांचा विमा काढून घ्यावा, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर मरतूक झाल्यास होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत मिळेल.
  • आपल्या फार्मजवळ देशी कोंबड्या पाळू नयेत किंवा अशा कोंबड्या फार्मच्या परिसरात येऊ देऊ नयेत.
  • शक्यतो आपल्या फार्मवर एकाच वेळी वेगवेगळ्या वयाचे पक्षी असू नयेत, यासाठी एकाच वयाचे पक्षी पालनपद्धत (ऑल इन ऑल आऊट) जास्त सोईस्कर असते. वेगवेगळ्या वयाचे पक्षी एकाच वेळी पाळल्यास एका वयाच्या पक्ष्यांकडून दुसऱ्या वयाच्या पक्ष्यांना रोगप्रसार होण्याची शक्यता असते.

डॉ. स्मिता आर. कोल्हे
संशोधन प्रकल्प प्रमुख, पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, शिरवळ, जि. सातारा
 

Web Title: Don't do this if you are running a poultry business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.