जीवनसत्त्व व क्षारांच्या कमतरतेमुळे कोंबड्यांना अनेक रोग होतात, त्यामुळे कुक्कुटपालकांचे नुकसान होते. हे रोग होऊ नयेत यासाठी कोंबड्यांना क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा आवश्यक त्या प्रमाणात केला पाहिजे. कोंबड्यांच्या वाढीसाठी जीवनसत्त्व क्षार अत्यंत महत्त्वाचे असतात. हे घटक खाद्यातून किंवा पाण्यातून पुरविणे आवश्यक आहे. त्यामुळे कोंबड्यांची वाढही चांगली होऊन आर्थिक उत्पन्नही वाढेल.
कोंबड्यांमध्ये 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावी न्युट्रीशनल रोप हा रोग होतो. कोंबड्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. पापण्या चिकटतात व त्यांतून घट्ट चिकट पांढरट स्त्राव बाहेर येतो. डोळे खराब होतात. पक्षी अशक्त होतो. पिसे पिंजारली जातात. अंड्यांचे उत्पादन कमी होते व पिल्ले निपजण्याचे प्रमाण कमी होते. अंड्यातील जिवात विकृती निर्माण होते. पक्ष्याचा तोल जातो. रक्ती हगवण, जंत यांना पक्षी सहज बळी पडतो. पक्ष्याचे शवविच्छेदन केले असता तोंड, अन्ननलिका, नाकाचा भाग यातील अंतस्थ त्वचेवर साबुदाण्याच्या आकाराच्या लहान गाठी किंवा फोड दिसून येतात. मूत्रपिंड फिके दिसते व त्यावर बारीक पांढऱ्या रेषा दिसतात.
'ड' जीवनसत्त्वाच्या अभावी कवच नसलेली अंडी निघतात. अंडी उत्पादन कमी होते, अंड्यांतून पिल्ले निघण्याचे प्रमाण कमी होते. हाडांमध्ये कॅल्शिअम भरला जात नाही, त्यामुळे हाडे रबरासारखी होतात, वाकतात व सांध्यांच्या ठिकाणी जाड होतात. पाय अशक्त होतात, पक्षी लंगडू लागतो. चोच रबरासारखी वाकते, वाढ खुंटते, शरीर वाकडेतिकडे होते. हाडे वाकतात व कोंबड्या गुडघ्यावर चालतात.
'ई' जीवनसत्त्वाच्या अभावी अंड्यांतून पिल्ले निघण्याचे प्रमाण कमी होते. तसेच पिल्लांना क्रेझी चीक डिसीझ हा रोग होतो. यामध्ये मान वाकडी होते व तोल जातो. कातडीखाली सूज येऊन हिरवट निळे पाणी साचते. मेंदू मऊ होतो, त्यावर बारीक टाचणीच्या टोकाएवढे रक्तस्त्राव आढळतात. त्याचा रंग हिरवट पिवळा किंवा तपकिरी असतो. हृदयाच्या कप्प्यामध्ये पातळ पिवळसर द्रव सापडतो.
'क' जीवनसत्त्वाच्या अभावी रक्तवाहिन्या फुटतात व रक्तस्त्राव होतो. मोठ्या आकाराचा रक्तस्त्राव पायांवर, छातीवर आणि पिसांवर आढळतो. शवविच्छेदन केले असता यकृतावर टाचणीच्या टोकाएवढा रक्स्त्राव आढळतो. रक्तस्त्राव जर जास्त असेल, तर कोंबडी ताबडतोब मरते.
जीवनसत्त्व ब-१ अभावी स्टार ग्रेझिंग व पॉलीन्युरायटीस रोग होतो. यामध्ये भूक मंदावते, वजन कमी होते, पिसे पिंजारली जातात, पक्षी लंगडू लागतात व पिल्लांचा तोल जातो. तुरा निळा पडतो. पिल्ले आकाशाकडे तोंड करून बसतात (स्टार ग्रेझिंग) डोके आत ओढून पिल्ले पडतात.
कॅल्शिअम व फॉस्फरस योग्य प्रमाणात न मिळाल्यास हाडांमध्ये कॅल्शिअम बरोबर भरला जात नाही. मुडदूस होतो. अंडी उत्पादन कमी होते. पक्षी कवच पातळ असलेली किंवा कवचहीन अंडी घालू लागतात. कोंबड्यांना केज लेअर फिटिंग रोग होतो. कारण कॅल्शिअम अभावी हाडे ठिसूळ झाल्यामुळे पायांना पॅरॅलिसिस होतो व पाय पसरले जातात.
मँगेनीज अभावी पायांचे सांधे जाड होतात. पायांच्या स्नायूंचे बंधन जेथून गेलेले असते, ती जागा भरून येते व त्यामुळे हे स्नायूबंधन सटकते व पाय बाहेरील बाजूस वाकडा होतो व पक्षी लंगडू लागतात. पक्षी पाय खरडत नेतो. अंडी देणाऱ्या कोंबड्यांत अंड्यांचे उत्पादन कमी होते. पिल्ले येण्याचे प्रमाण कमी होते. पिल्ले अंड्यातच मरतात. पिल्लांचे पाय आखूड व चोच पोपटासारखी होते.