Join us

'जीबीएस'च्या प्रादुर्भावामुळे विष्ठा नमुना तपासणी सुरू; काय म्हणता आहेत पशुसंवर्धन आयुक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:22 IST

GBS Poultry 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' या आजाराच्या प्रादुर्भावाशी कुक्कुट पक्ष्यांचा संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पुणे : 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' या आजाराच्या प्रादुर्भावाशी कुक्कुट पक्ष्यांचा संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याची प्रक्रिया सुरु आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार खडकवासला धरण परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करून परीक्षणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) कडे पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली. 

खडकवासला धरण परिसरात जीबीएस आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दूषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरण परिसरातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली. येथील उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळत नसल्याचे आढळून आले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण नमुन्यांपैकी १०६ क्लोॲकल स्वॅब ८९ व कुक्कुट विष्ठा १७ तसेच नमुने (९ प्रक्षेत्रावरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लॉॲकल स्वॅब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जिवाणूसाठी सकारात्मक आलेले आहेत. एका प्रक्षेत्रावरील ५ नमुने नोरोव्हायरससाठी सकारात्मक आलेले आहेत.

नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेने कुक्कुट प्रक्षेत्रावरील २९ पाणी नमुने तपासले असून, त्यापैकी २६ पाणी नमुने कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय अस्तित्व नकारात्मक आहे आणि उर्वरित ३ नमुने तपासणी सुरु आहे.

कुक्कुट प्रक्षेत्र धारकांनी जैवसुरक्षा सुनिश्चित करावी. व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. कोणतेही कुक्कुट पक्षी उत्सर्जने पाणवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.

जीबीएस आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्यास या जिवाणूचा संसर्ग होत नाही. त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नाही. - डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त

अधिक वाचा: Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान

टॅग्स :पोल्ट्रीशेतकरीशेतीराज्य सरकारकेंद्र सरकारसरकारधरणआयुक्त