कोंबड्यांना पावसाळ्यात विविध आजार होतात, योग्य वेळी, योग्य ते व्यवस्थापकीय बदल न केल्यास, त्याचा परिणाम कोंबड्यांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. कोंबड्यांच्या आरोग्याकडे आणि व्यवस्थापनाकडे पावसाळ्यात विशेष लक्ष दिले पाहिजे.
पावसाळ्यात परिसर स्वच्छ ठेवावा. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घ्यावे. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत. कोंबड्यांची शेड पूर्व-पश्चिम बांधलेली असावी. शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत. पोल्ट्री शेडवरील छताच्या पत्र्यांना छिद्रे पडलेली नाहीत; याची पावसाळ्यापूर्वी खात्री करून घ्यावी. छिद्रे असल्यास ती बंद करावीत. भिंतीच्या भेगा बुजवून पावसाचे पाणी शेडमध्ये गळणार नाही, याची काळजी घ्यावी.
- शेडमध्ये पावसाचे पाणी शिरु नये यासाठी प्लॅस्टीकचे पडदे वापरावेत. शेडला लावलेले पडदे मजबूत आणि छिद्रे नसलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी.
- दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. पक्ष्यांना त्रास होत नाही.
- गढूळ व शेवाळयुक्त पाण्यामुळे त्यात निरनिराळ्या जंतूंची वाढ होते, त्यामुळे कोंबड्या आजारी पडतात.
- कॉक्सीडीसीस रोगाच्या एकपेशीय जंतूंचे प्रमाण वाढते, पक्ष्यांमध्ये रक्ती हगवण दिसते.
- शेडमध्ये व गृहाच्या आसपास माश्यांचा प्रादुर्भाव होतो.
- शेडमध्ये वाढलेल्या अमोनियामुळे कोंबड्यांना डोळ्यांचा त्रास होतो, श्वसनसंस्थेचे रोग फैलावतात.
- ओल्या व दमट गादीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो.
- पावसाचे पाणी पक्षिगृहात शिरकाव करून गादी ओली होते, शेडमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढते.
- पक्ष्यांची गादी (लिटर) दिवसातून किमान एक वेळातरी चांगली खाली वर हलवून घ्यावी. ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते, पक्षी रोगास बळी पडण्याची शक्यता असते. चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झालेली असेल, तर गादीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी.
- पावसाळ्यात गादीमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या माझ्या गादीमध्ये अंडी घालतात. यामुळे कोंबड्या आजारी पडतात.
- गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सीडी ऑसीस रोगाचे एकपेशीय जंतूचे प्रमाण वाढते. गादीतील आर्द्रता कमी करण्यासाठी साधारणतः पाच किलो चुना प्रति १०० चौ. फूट जागा याप्रमाणे गादीमध्ये मिसळावा. पक्ष्यांमध्ये कॉक्सीडीऑसीसची लागण झाल्यास, ॲम्प्रोलीयम सोल्युबल पावडर ३० ग्रॅम प्रति २५ लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून पाच दिवस द्यावी.
- ओल्या गोण्यामध्ये पक्ष्यांचे खाद्य भरून साठवू नये. खाद्याची साठवणूक फक्त एक आठवड्यासाठीच करावी. जास्त दिवस खाद्य साठवून ठेवल्यास त्यामध्ये बुरशी होण्याचा धोका संभवतो.
- खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यांच्या गोण्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये. खाद्य ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.
- खाद्यामध्ये तज्ञांच्या शिफारशीनुसार बुरशीजन्य विषबाधा विरोधक (टॉक्सीन बायंडर) आणि रक्ती हगवण (कॉक्सीडी ऑसीस विरोधक कॉक्सीडीऑस्टॅट) औषधी योग्य प्रमाणात मिसळून घ्यावी, खाद्य तपासून घ्यावे.
- पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत.
- पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावून घ्यावे. भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून अधूनमधून चुना लावावा. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असू नये, अन्यथा पावसाचे पाणी टाकीत जाऊ शकते. त्यापासून कोंबड्यांना बाधा होऊ शकते.
- पक्षिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण औषध मिसळलेले पाय बुडविण्याचे भांडे (फूट डीप्स) ठेवावे. फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छ व निर्जंतुक कपडे, पादत्राणे वापरूनच प्रवेश द्यावा.
- आपल्या फार्मवर काम करणाऱ्या कामगारांशिवाय इतर नवीन माणसांना येण्यास प्रतिबंध घालावा.
- वाया गेलेले खाद्य, खराब झालेली गादी, विष्ठा इ. शेडजवळ टाकू नये. यासाठी प्रक्षेत्रावर वेगळा खड्डा करून त्यामध्ये टाकावे.
- पक्षिगृहाच्या बाहेरील जागेत किमान ३० फूट अंतरापर्यंत निर्जंतुक द्रावणाचा फवारा मारावा.
- रोगनिदानासाठी आजारी कोंबड्या अथवा मृत कोंबड्या जवळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवाव्यात. मृत कोंबड्या जाळाव्यात अथवा पुराव्यात.
- शक्यतो आपल्या फार्मवर एकाच वेळी वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या असू नयेत, यासाठी एकाच वयाच्या कोंबडीपालनाची पद्धत (ऑल इन, ऑल (आऊट) जास्त सोईस्कर असते. वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकाचवेळी पाळल्यास एका वयाच्या कोंबड्यांकडून दुसऱ्या वयाच्या कोंबड्यांमध्ये रोगप्रसार होण्याची शक्यता असते.
पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग
क्रांनापापम, शिरवळ, जि. सातारा