शेतीला जोडव्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील बरेचशे शेतकरी आणि महिला आता कुक्कुटपालनाकडे वळू लागल्या आहेत. कुक्कुटपालनातही आता पारंपरिक पद्धतीने परसातील कुक्कुटपालन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जात आहे. आतपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून असंख्य शेतकरी परसबागेतील कुक्कुटपालन करत आहेत.
नाशिक कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत आणि मालेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मालेगाव, बागलाण आदी तालुक्यात परसबागेतील कुक्कुटपालन आणि व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. यास शेतकऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. परसातील कुक्कुटपालनामध्ये मुख्यत्वेकरून मुळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. पारंपरिक परसातील कुक्कुटपालनात 15 ते 20 कोंबड्यांचे मुक्त पद्धतीने संगोपन केले जाते. कोंबड्या दिवसभर परसबागेमध्ये मोकाट सोडल्या जातात. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून खुराड्याची सोय केली जाते. संगोपन आणि खाद्यावर कमीत कमी खर्च केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना जोडव्यवसाय म्हणून परसबागेतील कुक्कुटपालन फायदेशीर ठरत आहे.
दरम्यान मालेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले जात आहे. यात कृषी विज्ञान केंद्राने यंदा बारामती येथे विकसित केलेल्या कावेरी जातीची निवड करण्यात आली आहे. येथून एका दिवसाचे पिल्लू आणून कृषी विज्ञान केंद्रामार्फत संगोपन केले जाते, त्यानंतर एक महिन्याच्या वाढीनंतर ते लाभार्थ्यांना दिले जाते. सद्यस्थितीत शंभरहून अधिक गावांमध्ये याचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिक देण्यात आले आहेत. त्यानुसार एका लाभार्थ्यास 25 पिल्ले दिली जातात सोबत 10-15 किलो खाद्य तसेच किट दिले जाते. तसेच कृषी विज्ञान केंद्राकडे असताना पिल्लाना लसीकरणासहा सर्व बाबी हाताळल्या जातात. त्यानंतर लाभार्थ्यांना संगोपनासाठी सुपूर्द केल्या जात असल्याची माहिती विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी दिली. याशिवाय या परसबागेतील कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद देखील चांगला लाभत असून येत्या काळात कळवण तालुक्यातही देखील हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परसातील कुक्कुटपालनाचे फायदे :
परसबागेतील कुक्कुटपालन हे वेळेची आणि खर्चाची बचत करणारे आहे. यातून अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजगार निर्माण होतो. गरीब शेतकरी त्यांच्या राहत्या घरामागील अंगणात कुक्कुट पक्षी पाळू शकतात. शिवाय हे ग्रामीण समुदायांना अतिरिक्त उत्पन्न देऊ शकते, कारण शेतकरी मांस आणि अंडी विकून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.