नाशिक : नाशिक जिल्ह्यांत अद्यापही अनेक भागात कुपोषणाचे प्रमाण पाहायला मिळत असून या पार्श्वभूमीवर वेगवगेळ्या उपायोजना राबविण्यात येत आहेत. आता नाशिक जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाकडून कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्याचे वाटप करण्यात आले आहे. पशु संवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असल्याने कुक्कुट गट वाटप उपक्रमातून तलंगा कोंबड्यासह खाद्याचे वाटप करण्यात आले.
नाशिक जिल्हा परिषद सेस योजनेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत २५+३ कोंबडीचे तलंगा गट वाटप करण्यात आले. यासाठी सुरगाणा पंचायत समिती सुरगाणा व बाऱ्हे बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्या देण्यात आल्या. यामध्ये 25 मादी कोंबड्या व तीन नरकोंबडे व त्यासोबत कोंबड्याचे खाद्य वाटप करण्यात आले. सदर योजना जिल्हा परिषदच्या सेस फंडातून राबविण्यात येत आहे.
योजनेचे उद्दिष्ट काय?
दरम्यान सुरगाणा हा आकांक्षीत तालुका असून सुरगाणा मध्ये कुपोषणाचे प्रमाण आहे हे कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय यांच्या समन्वयाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचे उद्दिष्ट कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्याचे वाटप करून त्यातून मिळणारे अंडी द्वारा लाभार्थी यांना प्रथिनेयुक्त आहार मिळावा व उरलेल्या अंड्यातून त्यांना रोजगार मिळून आर्थिक लाभ व्हावा हे उद्दिष्ट ठेवून सदरची योजना राबविण्यात येत आहे.सदर योजनेचा योग्य लाभ घेऊन अधिकाधिक कोंबडी व अंडी उत्पादन करावे. कोंबड्याचे योग्य संगोपन करावे व अधिकाधिक उत्पादन करावे. त्यातून पिल्लांची पैदास करून कुक्कुटपालन व्यवसाय कसा वाढीस लागेल, याबाबत लाभार्थी यांनी प्रयत्न करावे, कोंबडी कापुन न खाता व विकून न टाकता अंड्यांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन केले.
कुपोषित बालकांना आहार कसा असावा?
कर्बोदके : शरीराच्या विविध कार्यासाठी उर्जा देण्याचे काम कर्बोदके करतात. जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केल्यास लट्ठपणा येतो, कमी प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा येतो.सर्व प्रकारचे तृणधान्य, बटाटे, रताळे, फळ , गुळ ,साखर, मध, गहू, बाजरी, मका, तांदूळ, ज्वारी, साबुदाणा, भगर व अन्य उपवासाचे पदार्थ.
प्रथिने : स्नायुंच्या बळकटी साठी व शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मांस, अंडी यातून मिळते.
जीवनसत्त्वे : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हार्मोन्स आणि एंझीम्सच्या विकासासाठी आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळ यातून जीवनसत्त्वे मिळतात.
खनिजे : लोह, कॅल्शियम ही खनिजे मानवाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत मिळते. कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या वाआधीसाठी व आरोग्यासाठी आवश्यक असते.