Poultry Farming : भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु, आपल्या देशात शेतीनैसर्गिक पावसावर (Rain) अवलंबुन असल्याने, निव्वळ शेती फायदेशीर ठरू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. शेतकरी कुटुंबास वाढत्या महागाईबरोबर वाढत्या उत्पन्नाची सांगड घालणे गरजेचे आहे. आज शिक्षित युवक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत असल्यामुळे, गावातील शेती मोठ्या प्रमाणावर अशिक्षित लोकांच्या हाती आहे.
नविन तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्ण वापर या लोकांकडून केला जात नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे नियोजन देखील कोलमडते आहे. अशा वेळी कमी भांडवलातील, हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारा परसातील कुक्कुटपालनासारखा व्यवसाय, ग्रामीण भागामध्ये फोफावल्यास तेथील सुशिक्षित बेरोजगारांसाठी, रोजगाराचा समर्थ पर्याय त्याच वातावरणात उपलब्ध होणार आहेयातून ग्रामीण अर्थव्यवस्था निश्चितच उंचविता येणे शक्य आहे.
अन्य पशुपालनाच्या तुलनेत परसातील कुक्कुटपालनासाठी (Backyard Poultry Farm) कमी जागा लागते. यासाठी उपलब्ध असलेल्या नापीक जमिनीचाही वापर करता येतो. कृषि व्यवसायासाठी आवश्यक असलेले सेंद्रिय खत कुक्कुटपालन उद्योगापासून मोठ्या प्रमाणावर मिळते. कुक्कुटपालनापासून मिळणारे सर्व फायदे विचारात घेता, कमी गुंतवणूकीमध्ये जास्तीत-जास्त उत्पन्न मिळवून देणारा असा हा व्यवसाय आहे. दैनंदिन जीवनातील इतर आवश्यक जबाबदाऱ्या सांभाळून देखील कुक्कुटपालन (Poultry Farm Business) व्यवसाय करता येण्यासारखा आहे.
कुक्कुट पालनाची वैशिष्ट्ये
- शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय मोठया प्रमाणावर केला जातो.
- या व्यवसाय गुंतवणूक केलेले भांडवल लवकरच मिळते.
- कोंबड्या पासून अंडी, मांस तर मिळतेच त्याचबरोबर कोंबड्यांचे खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त म्हणून मोठया प्रमाणावर त्याला मागणी असते.
- जर मांसल कोंबड्या पाळल्या, तर ह्या धंद्यात नफा दोन महिन्याच्या आतच मिळतो. तसेच गुंतवणूक केलेले भांडवल पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवता येते.
- आपल्या कडेच नव्हे तर संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून अत्यंत उपयुक्त, असल्यामुळे किफायतशीर ठरलेला आहे.
- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशू विज्ञान, केव्हीके, मालेगाव