Poultry Farming :शेतीला जोडव्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आणि महिला आता कुक्कुटपालनाकडे (Poultry Farming) वळू लागले आहेत. कुक्कुटपालनातही आता पारंपरिक पद्धतीने परसबागेतील कुक्कुटपालन (backyard Poultry Farming) करण्यावर भर दिला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, बागलाण तालुक्यातील महिलांनी मागील सहा महिन्यात यशस्वी कुक्कुटपालन करून दाखविले आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून कोंबडी पालन व शेळीपालन (Sheli Palan) हे शेतीपूरक व्यवसाय आहेत. परंतु या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प स्वरूपाचे असल्यामुळे शेतीचे उत्पन्न अत्यल्प होते. शेतीचे उत्पन्न वाढवणीसाठी व ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मालेगाव तालुक्यातील ५० , बागलाण तालुक्यातील ५० आणि कळवण तालुक्यातील ५० शेतकरी महिला अशा एकूण दीडशेहून अधिक महिला कृषी विज्ञान केंद्र मालेगाव (Krushi Vidnyan kendra Malegaon) व आत्मा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या परसबागेतील कुक्कुटपालन करत आहेत.
सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या तीन तालुक्यातील निवडलेल्या गावांमध्ये प्रात्यक्षिके प्रशिक्षणे राबविण्यात आली. या प्रात्यक्षिकांचा माध्यमातून सदर गावातील महिला, त्यांचे व्यवसाय व उत्पनाचे साधन यानुसार सर्वेक्षण करण्यात आले. कुक्कुटपालन प्रात्याक्षिकासाठी निवड केलेल्या महिलांना कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर संबधित तालुक्यातील महिलांची निवड करून कुक्कुटपालन प्रात्यक्षिक कीट वाटप करण्यात आले.
चार हजार रुपयांचे किट वाटप
या कुक्कुटपालनासाठी कावेरी जातीच्या कोंबडीची निवड करण्यात आली. त्यानुसार प्रात्यक्षिक कीटमध्ये यामध्ये २१ दिवसीय कावेरी जातीच्या कोंबडीची २५ पिल्ले १०० रुपयांप्रमाणे २५०० रुपये, १०२० रुपयांचे ३० किलोचे कोंबडी खाद्य, २१५ रुपयांचे खाद्य भांडे, १२१ रुपयांचे पाणी, २६४ रुपयांचे लसीकरण किट असे एकूण चार हजार रुपयांचे किट प्रति लाभार्थी, तर असे एकूण २०० लाभार्थ्यांना ५० संपूर्ण कीटचे वाटप करण्यात आले होते.
कावेरी जातीच्या कोंबडीची वैशिष्ट्ये :
- हि कोंबडी दिसायला अगदी गावरान कोंबडी सारखी रंगीत पिसारा असणारी आहे.
- या कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरान सारखे चवदार असते
- या कोंबडीची अंडी दिसायला आणि चवीला गावरान सारखी आहेत.
- साधारणता या कोंबड्या वर्षभरात १८० ते २०० अंडी देतात.
- अंड्यांसाठी आणि मांसासाठी दोन्ही उद्देशासाठी हि जात फायदेशीर आहे.
तीन हजारांचे उत्पन्न
या तीनही तालुक्यात प्रात्यक्षिक सुरु होऊन जवळपास ६ महिने झाले असून कोंबड्यांचे सध्याचे वय हे जवळपास आता ७-८ महिने असे आहे. जवळपास सर्वच लाभार्थ्यांकडील कोंबड्या आता अंडी देण्यास सुरवात झाली आहे. त्यांनी प्रती अंडी १० रुपये याप्रमाणे विक्री सुरु केली आहे. एक महिन्याचा विचार केला असता एका लाभार्थ्याकडे दिवसाला ७ ते १० अंडी उत्पादन मिळत आहे. म्हणजेच महिन्याकाठी २५०० ते ३००० रुपयांचे उत्पन्न महिला घेत आहेत. या प्रकल्प राबविण्यासाठी विशेष मेहनत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी घेतली आहे.