हवामान बदलामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे. अशा परिस्थितीत कुक्कुट आणि जनावरे पालन करून शेतकरी आपली गुजराण करतात. मात्र, आता उन्हामुळे शेतकऱ्यांचा पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडल्याचे चित्र आहे. कुठे पाणीटंचाईमुळे अनेकांनी आपली जनावरे विक्रीस काढली आहेत, तर काहींनी कुक्कुटपालन बंद केले आहे. तर काही प्रमाणात महागाईचीही झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.
राज्यभरात गत काही दिवसांपासून तापमानाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे बॉयलर कोंबड्याचे कुक्कुटपालन अडचणीत आले आहे. या कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जास्त होतो. महिनाभरापासून रात्री हलका गारवा आणि दिवसा कडक ऊन असे वातावरण असल्याने अशा विषम हवामानाचा थेट परिणाम होऊन कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार, पिंपळगाव राजा, पोरज, बोरजवळा, कुंबेफळ, रोहणा, पळशी बु परिसरातील पोल्ट्री व्यवसायाला उन्हाच्या चटक्यांचा चांगलाच फटका बसत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. पोल्ट्री व्यवसाय काही शेतकऱ्यांचा प्रमुख शेतीपूरक व्यवसाय बनला असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांनी मोठी प्रगती साधली आहे. परंतु सध्या कोंबड्यांना उन्हाळी वातावरण मानवत नाही, त्यातच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असल्याने कोंबड्या आणि दुधाळ जनावरांचे संगोपन करणे कष्टप्रद झाले आहे. कोंबड्यांना पाणी बदल करावे लागत नाही, तसे केले तर सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोंबड्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच ठिकाणी द्यावे लागते. मात्र, सध्या विहिरीसह कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणे अवघड बनल्याचे चित्र आहे.
संगोपन खर्च वाढला !
संगोपनखर्चात वाढ गत काही दिवसांत मक्याचे भाव वाढल्याने कोंबड्यांचे खाद्य महाग झाले आहे. परिणामी कोंबड्यांच्या संगोपनखर्चात वाढ झाली आहे. शिवाय, वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांचे वजन न वाढणे, उन्हाळ्यातील पाणीटंचाई, मजुरांची टंचाई, गव्हाच्या भुश्श्याची कमतरता यामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे. परिणामी अनेक व्यावसाविकांचे शेड उन्हाळ्यात रिकामे राहतात.
उष्णता आणि पाणीटंचाईमुळे कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड बनले आहे. गत काही दिवसांत महागाईमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आहे. विपरीत हवामानाचही फटका या व्यवसायाला बसत आहे. शिवाय चाराटंचाईचेही सावट गडद आहे. त्यामुळे पक्षी विक्रीस काउली आहेत.
- राजेंदसिंह बोराडे, पोरज, ता. खामगाव
सध्या तापमान वाढत असल्याने पक्ष्याची घराची हिट कमी करता येईल हे बघावे, यासाठी गोणपाट लावून पाण्याची फवारणी करा, आजूबाजूला झाडांची संख्या वाढवा... पक्षी बसतात, त्या ठिकाणची जाडी वाढवा, जुने असेल तर नवीन करा, पक्ष्यांच्या खाद्यात बदल करा, पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवा, शिवाय पक्ष्यांना उष्णतेपासून संरक्षणासाठी टरबूज खापा खाण्यास द्याव्यात. अधिक गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील कार्यवाही करावी. - डॉ. श्याम पाटील, पशुवैद्यक विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र नाशिक