Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट

नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट

Left the job and took out the poultry, now it is flourishing | नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट

नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट

नंदुरबारचा एक तरुण अभियंता स्वत:च्या उद्योगाचे स्वप्न पाहतो आणि पूर्णही करतो. अवघ्या पंचवीस वर्षीय मयुर बोरसे यांची ही यशकथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते.

नंदुरबारचा एक तरुण अभियंता स्वत:च्या उद्योगाचे स्वप्न पाहतो आणि पूर्णही करतो. अवघ्या पंचवीस वर्षीय मयुर बोरसे यांची ही यशकथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते.

शेअर :

Join us
Join usNext

मॅकॅनिकलमध्ये बीई केल्यानंतर मी पुण्यात एका कंपनीत नोकरीला लागलो. त्यानंतर मग जळगाव येथे एका कंपनीत नोकरी केली. 12 ते 15 हजार पगार मिळाला. नोकरी सोडली तेव्हा शेवटचा पगार होता जेमतेम 15 हजार. याशिवाय घरापासून, गावापासून दोन-तीनशे मैल लांब राहावे लागे ते वेगळेच. एक दिवस लक्षात आले की घरापासून एवढ्या लांब नोकरीसाठी थांबून काहीच साध्य होणार नाही. हा मार्ग आपला नव्हे. आपण सरळ आपल्या गावी परत जाऊ आणि एखादी स्टार्टअप कंपनी सुरू करू. हा विचार केला आणि कृतीतही आणला.

सरळ नंदुरबारला निघून आलो. सुरवातीला दोन-तीन व्यवसाय डोळ्यासमोर होते. माझे वडील नोकरी करत असले, तरी मूळचे आम्ही शेतकरी आहोत. दहा एकर शेत आहे आमचे. मग त्या शेतीलाच जोडधंदा म्हणून ‘पोल्ट्री’ सुरू करण्याची कल्पना आली. मोठ्या मेहनतीने मी ती प्रत्यक्षात उतरविली आणि आज माझ्याकडे साडेसात हजार कोंबड्यांची पोल्ट्री आहे.’ नंदुरबार येथील 25 वर्षीय मयुर बोरसे सांगत होते.

नंदुरबार शहरापासून सुमारे दहा किलामीटर अंतरावर  त्यांनी स्वत:चा पोल्ट्री फार्म सुरू केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा लाभ त्यांनी घेतल्यामुळे त्यांचे स्वत:च्या व्यवसायाचे स्वप्न साकार होऊ शकले.

योजनेची माहिती मिळाल्यापासून ते कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर होण्यासाठी केवळ महिनाभराचाच कालावधी लागला. मात्र व्यवसाय सुरू करणे इतके सोपे नव्हते. वडिल नोकरीला असल्याने मुलानेही नोकरी करावी असे त्यांना वाटे. त्यामुळे आधी तर घरून थोडा विरोध झाला. दुसरीकडे नोकरी सोडून व्यवसायासाठी जे भांडवल लागते तेवढे पैसेही त्यांच्याकडे जमलेले नव्हते.

अशा स्थितीत नोकरी सोडून करायचे काय? या विचाराने मयूर बोरसे तणावाखाली होते. मात्र नंतर घरच्यांचा विरोध मावळला आणि स्वत:च्या व्यवसायाचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. व्यवसाय सुरू करायचाच म्हटल्यावर सर्वात मोठा आणि मुख्य प्रश्न होता तो भांडवलाचा. त्यासाठी काही बँकांचे उंबरे झिझवले, पण पदरी निराशा आली.

त्याचवेळेस मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्जवाटपाची घोषणा केली. ती त्यांनी टिव्हीच्या माध्यमातून ऐकल्यानंतर त्यांनी ऑनलाईन नावनोंदणी करून या योजनेअंतर्गत अर्ज केला. योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना दहा लाख मंजूर झाले. आयडीबीआय बँकेमार्फत त्यांनी कर्जप्रकरण केले होते. त्यांना सध्या तीन महिन्यांचा हप्ता 60 हजार रुपये असून कर्जाचा व्याज परतावा मिळायला सुरूवातही झाली आहे.

त्यानुसार त्यांच्या खात्यावर 26 हजार रुपये जमाही झाले आहे. ‘अगदी योग्य वेळेवर मला ही योजना समजली आणि त्याचा फायदाही झाला. आज कुणाकडे तुम्ही 100 रुपये मागितले तरी ते मिळणं मुश्किल, पण इथे तर दहा लाख रुपयांवरील 12 टक्केप्रमाणे येणारे भरमसाठ व्याजच मला माफ झाले आहे. उद्योगाची कास धरणार्‍या माझ्यासारख्या तरुणासाठी ही बाब खूप म्हणजे खूपच मोठी आहे’, मयूर बोरसे उत्साहाने सांगतात.

पोल्ट्री अर्थातच कुक्कुटपालन सुरू केल्यानंतर त्यांनी सगुणा कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने व्यवसाय सुरू केला. कंपनीतर्फे कोंबडीची पिले दिली जातात. त्यांचा 45 दिवसांपर्यंत त्यांची योग्य निगा आणि सांभाळ करावा लागतो. त्यानंतर पिलांचे पक्षात रुपांतर झाले की प्रतिकिलो दराप्रमाणे कंपनी पक्षी खरेदी करते. मयुर यांची पहिली बॅच साडेसात हजार पक्षांची होती. पक्षी मोठे होऊन त्यांची कंपनीला विक्रीही झाली आहे.

त्यानंतर 20 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांनी पुन्हा साडेसात हजार पक्षांची दुसरी बॅच सुरू केली आहे. त्यांच्याकडे आता सात लोक कामाला आहे. म्हणजेच त्यांनी आता स्वत:सह सात कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे. आता ते नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे झाले आहेत. भविष्यात पोल्ट्रीसोबतच शेततळ्यातील मत्स्यपालन व्यवसाय करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी शासनाच्या शेततळे योजनेअंतर्गत एक शेततळेही त्यांच्या शेतात आता तयार झालेय. पावसाळ्यात त्यात पाणी साठले की ते हा नवा व्यवसायही सुरू करणार आहे.

सुशिक्षित तरुणांनी आता शेतीसोबतच त्यावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू केले, तर शेती फायद्याची होईलच, पण सोबत देशही शेतीक्षेत्रात क्रांती करेल असा सार्थ विश्वास त्यांना वाटतो.

Web Title: Left the job and took out the poultry, now it is flourishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.