Join us

हिवाळ्यात कुक्कुटपालनाचे व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 6:34 PM

हिवाळ्यामध्ये पक्ष्यांच्या घरट्यामधील आणि बाह्य बाताबरणातील तापमान कमी झाल्यामुळे पक्ष्यांमध्ये विपरित परिणाम आढळतात हे टाळण्यासाठी हिवाळ्यामधील कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल केल्यास त्याचा चांगला फायदा होते.

आपल्याकडे ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांत तापमान कमी असते. हिवाळ्यात पक्षी जास्त खाद्य खातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान वातावरणातील बदलामध्ये कायम राखण्यासाठी त्यांना अन्नघटकांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा बराच भाग खर्च करावा लागतो, अशा काळामध्ये पक्ष्यांना आवश्यकतेपेक्षा कमी खाद्य दिल्यास त्यांची वाढ खुंटते. गादी पद्धतीमध्ये ठेवलेल्या पक्ष्यांमध्ये त्यांची गादी हिवाळ्यात ओलसर राहते. याचे मुख्य कारण म्हणजे हिवाळ्यात गादीमधील आर्द्रतेचे (पाण्याचे) बाष्पीभवन होत नाही.

घरट्यातील ओलसरपणामुळे जिबाणु, बुरशी, कॉक्सिडीया यांसारख्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या जंतूंची वाढ होऊन पक्षी आजारास बळी पडतात. हिवाळ्यात कोंबड्यांना मुख्यत: इन्फेक्सिअस कोरायझा, क्रॉनिक रेस्पायरेटरी डिसीज (सीआरडी) यासारखे जिवाणूजन्य तर अॅस्परजिलोसिससारखा बुरशीजन्य आणि रक्ती हगवण यांसारखे आदी जीवजन्य आजार उद्भवतात.

हिवाळ्यामध्ये लहान पिलाच्या उबदार घरट्यातील (ब्रुडर हाऊस) तापमान अचानक कमी होते. तेव्हा अशा पिल्लांमध्ये मरतुकीचे प्रमाण खूपच वाढते. हिवाळ्यामध्ये पक्ष्यांच्या घरट्यामधील आणि बाह्य वाताबरणातील तापमान कमी झाल्यामुळे पक्ष्यांमध्ये विपरित परिणाम आढळतात हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हिवाळ्यामधील कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल केल्यास त्याचा चांगला फायदा होते.

पक्ष्यांची गादीहिवाळ्यामध्ये पक्ष्यांच्या गादीचा ओलसर झालेला भाग काढून टाकावा. ओल्या झालेल्या गादीमध्ये दोन ते तीन किलो चुना अथवा चुनखडी प्रति १०० चौ. फुटांसाठी गादीमध्ये मिसळावा. पक्ष्यांची गादी ओली झाल्यामुळे घरट्यामधील अमोनिया या वायूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. गादीचा थर साधारणतः पाच ते सहा इंच उंच ठेवावा. गादी सतत वर-खाली करावी. त्यानेही ती कोरडी राहण्यास मदत होते.

पक्ष्यांचे पाणीहिवाळ्यामध्ये पाण्याद्वारे झपाट्याने पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर एक ग्रॅम (ज्यामध्ये ३३ टक्के क्लोरिन असते) ते जवळ जवळ ५०० लिटर पाण्यासाठी पुरेसे होते. याशिवाय बाजारामध्ये पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विविध औषधी उपलब्ध आहेत. पक्ष्यांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी पाण्यामधून जीवनसत्त्वे घ्यावीत. यामध्ये जीवनसत्त्व 'ब' 'क' किंवा क्षारयुक्त पावडर किंवा ताण कमी करणाऱ्या औषधांचा वापर करावा.

पक्ष्यांचे खाद्यहिवाळ्यात पक्षी जास्त खाद्य खातात. त्यामुळे पक्ष्यांच्या खाद्य घटकांमध्ये आवश्यक ते बदल करून पक्ष्यांना खाद्य देणे योग्य होईल. अशा काळात आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण (१०० किलो कॅलरीज प्रति किलो खाद्यामध्ये) वाढविणे आणि प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के कमी करणे आवश्यक असते. ऊर्जेचे प्रमाण ३००० किलो कॅलरीजवरून ३२०० किलो कॅलरीजपर्यंत खाद्यामध्ये वाढवावे. त्याचप्रमाणे खाद्यामधील 'अ' व 'ई' ही जीवनसत्त्वे वाढवावीत.

पक्षी शेडचे व्यवस्थापनरात्रीच्या वेळी पक्ष्यांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या दोन्ही बाजूने पॉलिथिनचे पडदे झाकावेत. परंतु पडदे टाकताना वरच्या बाजूने एक फूट फट सोडावी. दिवसा शक्यतो पडदे बंद ठेवू नयेत. शेडमधील तापमान वाढविण्यासाठी विजेचे बल्ब, शेगडी यांसारख्या उपकरणांच्या साहाय्याने उष्णता पुरवावी. अचानक वीज प्रवाह खंडित झाल्यास शेडवर तातडीची सुविधा उपलब्ध करावी.

डॉ. व्ही. डी. लोणकरडॉ. ए. एस. कदमकुक्कुटपालन शास्त्र विभाग, क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ

टॅग्स :शेतकरीवीज