पावसाळी वातावरणामुळे कोंबड्यांना आजार होतात. त्यामुळे हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक असते. त्यासाठी काही गोष्टींचा अंगीकार करणे आवश्यक असते.
पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घ्यावेत. पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत.
पावसाळ्यामध्ये शक्यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. पक्ष्यांना त्रास होत नाही.
पक्ष्यांची गादी (लिटर) दिवसातून किमान एक वेळातरी चांगली खाली-वर हलवून घ्यावी. ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते, पक्षी रोगास बळी पडण्याची शक्यता असते. चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झालेली असेल, तर गादीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी.
गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सीडीऑसीस रोगाचे एकपेशीय जंतूंचे प्रमाण वाढते. गादीतील आर्द्रता कमी करण्यासाठी शिफारशीनुसार चुना मिसळावा. शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यांच्या गोण्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये. कोंबडी खाद्य तपासून घ्यावे. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये शिफारशीत जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत.
पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावून घ्यावे. भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून चुना लावावा..- डॉ .गणेश यु .काळुसे, कृषि विज्ञान केंद्र , बुलढाणा