Join us

बॅगवर अन्नघटक नमूद करा; पोल्ट्री व्यावसायिकांनी खाद्यपुरवठा कंपन्यांना खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 10:36 AM

पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

अलिबाग, पेण : पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

पक्ष्यांच्या खाद्य बॅगवर खाद्यातील अन्नघटक नमूद करण्यात शासनाने बंधनकारक केले आहे. या निर्णयाला दोन महिने उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाही. याबाबतचा जाब कंपनी अधिकाऱ्यांना बैठकीत विचारण्यात आला.

याबाबत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे सक्त आदेश पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी बैठकीत दिल्याने शेतकरी शांत झाले.

बैठकीला महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सचिव विलास साळवी, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कोकण विभाग दीपक पाटील, जिल्हा संचालक मनोज दासगावकर, पेण तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, अलिबाग तालुकाध्यक्ष अनिकेत पाटील, पाली सुधागड अध्यक्ष निखिल ढोकळे, खालापूर संचालक चंद्रहास बांदल, संचालक राजेश पाटील, शंकर तांबोळी, प्रकाश पाटील उपस्थित होते.

समस्यांचा वाचला पाढा

बैठकीत पोल्ट्री योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल खामकर यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याचा पाढा उपायुक्त देशपांडे यांच्या समोर वाचला. शासनाने अध्यादेश काढून दोन महिने झाले तरी कंपन्या शासन निर्णयाचे पालन करीत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा : Poultry Success Story : कुक्कुटपालनातील खान्देशभूषण; कोंबडी पालनात 'या' पद्धतीचा वापर करत वार्षिक लाखोंची उलाढाल

उपायुक्तांना म्हणणे पटले

अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी पोल्ट्री व्यावसिायकांची बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती १५ ऑक्टोबरनंतर पुरविण्यात येणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर अन्न घटक नमूद करण्यात यावे, करार करताना शासनाच्या अटी-शर्तीचे पालन करून ठरवून दिलेल्या नमुना म्हणून करार करण्यात यावा, असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले.

आमच्याशी व्हॉटसअप्प वर जोडण्यासाठी 'येथे' क्लिक करा.

टॅग्स :शेती क्षेत्ररायगडअलिबागपेणशेतकरीशेती