कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्याची गुणवत्ता ही अतिशय महत्वाची बाब आहे. कुक्कुट मांस आणि अंडी उत्पादनाचे प्रमाण व त्याची गुणवत्ता, त्याचप्रमाणे कुक्कुट पक्ष्यांचे आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमता ही खाद्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
कुक्कुटपालन व्यवसायामध्ये साधारणपणे ६५-७० टक्के खर्च खाद्याचा असतो. त्यामुळे खाद्याची गुणवत्ता ही कुक्कुटपालन व्यसायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे.
फुड्स सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या दि.१७.१२.२०१९ आणि दि.२७.०१.२०२० रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार राज्यात आयएसआय मार्क (बीआयएस प्रमाणकाप्रमाणे) पशुखाद्याचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक आहे.
त्याच धर्तीवर सर्व कुक्कुट खाद्य उत्पादन (स्वतःच्या वापराकरिता, बाजारात विक्रीकरिता तसेच, करार पध्दतीने कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या) कंपन्यांनी कुक्कुट खाद्य उत्पादित करुन त्याची वितरण/विक्री करतांना खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) परवानाधारक पशुखाद्य उत्पादक संस्थांनी भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणकाप्रमाणेच पशुखाद्याचे उत्पादन करावयाचे असून, पशुखाद्याच्या पॅकिंग बॅगवर पशुखाद्यातील अन्नघटकाचे प्रमाण ठळकपणे नमुद करावयाचे आहे.
त्याच धर्तीवर सर्व कुक्कुट खाद्य उत्पादक कंपन्यांनी कुक्कुट खाद्याच्या पॅकिंग बॅगवर कुक्कुट खाद्यातील उर्जा (Energy), कुड प्रोटीन, क्रुड फॅट, कुड फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, अॅश, मॉइश्चर या अन्नघटकांचे प्रमाण ठळकपणे नमुद करावयाचे आहे.
"The Food Safety and Standards (Packaging and Labelling) Regulation 2011" अन्वये मानवी खाद्याच्या प्रत्येक पॅकिंगवर अन्नघटकांचे प्रमाण नमूद करणे बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे कुक्कुट खाद्याच्या पॅकिंग बॅगवर उपरोक्त नमूद विविध अन्नघटकांच्या प्रमाणासोबतच खालील बाबीही नमूद कराव्यात.
क) उत्पादन संस्थेचे नाव व पत्ता
ख) उत्पादक परवाना क्रमांक
ग) कुक्कुट खाद्य उत्पादनाचा दिनांक व बॅच क्रमांक
घ) सदर उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक (बेस्ट बिफोर युज)
ड) निव्वळ वजन (नेट वेट)
च) विपनण (मार्केटिंग) कंपनीचे नाव व पत्ता
छ) कुक्कुट खाद्यात पशुजन्य घटक असल्यास नमुद करावे.
प्रीस्टार्टर, स्टार्टर, फिनीशर, चीक फिड, ग्रोवर फिड, लेअर फिड, इ. कुक्कुट खाद्यामधील विविध अन्नघटक हे पॅकिंग बॅगवरील नमुद पशुखाद्यातील प्रमाणानुसार असणे आवश्यक आहे.
कुक्कुट खाद्य तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या खाद्य घटकांमधील विविध अन्न घटकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तसेच, उत्पादीत केलेल्या प्रत्येक बॅचमधील कुक्कुट खाद्यातील विविध अन्न घटकांचे देखील विश्लेषण करणे आवश्यक आहे.
कुक्कुट खाद्य तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या खाद्य घटकांमधील तसेच, तयार कुक्कुट खाद्यमधील बुरशीजन्य टॉक्सीनच्या प्रमाणाबाबत विश्लेषण करणे आवश्यक आहे.
कुक्कुट खाद्य तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या खाद्य घटक तसेच, तयार कुक्कुट खाद्याची वाहतुक व साठवणूक योग्य प्रकारे करण्यात यावी जेणेकरून खाद्याच्या गुणवत्तेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.
सर्व कुक्कुट खाद्य उत्पादक कंपन्यांनी सदर संस्था ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहे त्या तालुक्याचे संनियंत्रण करणाऱ्या सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या कुक्कुट खाद्याचे यादृच्छिकपणे (रँडमली) नमुने घेवून, सदर कुक्कुट खाद्य नमुन्यांची शासन मान्यता प्राप्त सक्षम प्रयोगशाळेकडून नियमितपणे तपासणी करावी.
कुक्कुट खाद्य उत्पादकांनी तसेच, करार पध्दतीने कुक्कुटपालन करणाऱ्या कंपन्यांनी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महीन्याच्या कालावधीमध्ये उक्त नमूद कार्यवाही करावी. अन्यथा, अशा कुक्कुट खाद्य उत्पादकांना तसेच, करार पध्दतीने कुक्कुटपालन करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्याकडे उत्पादित होणाऱ्या कुक्कुट खाद्याची कंत्राटी कुक्कुट पालन करताना कंपनी तर्फे शेतकऱ्यांना कुक्कुट खाद्य पुरविता येणार नाही अथवा बाजारात विक्री करता येणार नाही.