कोंबड्याना होणारा मानमोडी हा संसर्गजन्य आजार असून यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाचे अर्थशास्त्र कोलमडून पडते. या रोगामध्ये पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ते १०० टक्के असते. याचसाठी हा रोग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. हा रोग होऊ नये यासाठी लसीकरण करावे.
मानमोडी हा रोग पॅरामिक्सो विषाणूंमुळे होतो. हे विषाणू पक्ष्यांचे श्वसनेंद्रिय, पचनसंस्था, मज्जासंस्था व यकृत यांसारख्या अवयवांवर परिणाम करतात. त्यामुळे रोग लक्षणांवरून हे विषाणू विभागले गेले आहेत. यातील लँटोजेनिक प्रकारच्या विषाणूंमुळे अंडी उत्पादन कमी होते. श्वसनास किंचित प्रमाणात त्रास होतो. मेसोजेनिक विषाणूंमुळे पक्ष्यांना हिरवी हगवण होते, पंख व पाय अधू होतात व मान वाकडी होते. यामध्ये मरतुकीचे प्रमाण ९० टक्के इतके असते. व्हेलोजेनिक प्रकाराच्या विषाणूंमुळे तिव्र श्वासोच्छवासाचा कठीण होतो व मेंदूशी संबंधीत लक्षणे आढळतात. या प्रकारचे विषाणू अतिशय धोकादायक असतात.
या रोगाचा प्रसार हवेद्वारे, आजारी पक्ष्यांच्या विष्टेद्वारे व श्वसनाद्वारे होतो. आजारी पक्ष्यांमुळे पक्षीघरातील वातावरण, उपकरणे व काम करणाऱ्यांच्या कपड्यांवर हे विषाणू मोठ्या प्रमाणात जमा होतात. हे विषाणू वातावरणात बराच वेळ टिकून राहतात. दूषित खाद्य व पाणी, मेलेले पक्षी उघड्यावर टाकणे, लिटर, अंडी उबवणूक यंत्र, इ. पासून या रोगाचा प्रसार होतो. इतर जातींच्या पक्ष्यांना सुद्धा हा रोग होतो व हे पक्षी रोगप्रसारास कारणीभूत ठरतात. म्हणून पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन करावे.
लक्षणे - या रोगाची लक्षणे, मृत्यूचे प्रमाण, तीव्रता ही विषाणूंचा प्रकार, पक्ष्यांचे वय, लसीकरण, रोगप्रतिकारक शक्ती, साथ, वातावरण व व्यवस्थापन यावर अवलंबून असतात. मोठ्या पक्ष्यांमध्ये अधिकाधिक पक्षी एका रात्रीत आजारी पडतात.- पक्ष्यांना पाण्यासारखी हिरवट रंगाची संडास होते, पंख व पाय आधु होतात. मान वाकडी होते.- अंडी देण्याचे प्रमाण घटते. कवच मऊ होते व अंड्याचा आकार बदलतो तसेच पांढरा बलक पाण्यासारखा पातळ होतो.- श्वास घेताना मोठा आवाज होतो. तोंडाने श्वासोच्छवास करतात.- लहान पिलांमध्ये हा तीव्र स्वरूपाचा आजार असून श्वसनाची व मज्जासंस्थेची लक्षणे दिसून येतात.- पिल्ले व तलंग सुस्त व अशक्त दिसतात.- पक्ष्यांना चालता येत नाही, थरथर कापतात व लंगडतात. डोळा आणि गळ्याला सुज येते.
उपचार- या रोगावर परिणामकारक उपचार उपलब्ध नाहीत; परंतु या रोगानंतर होणाऱ्या जिवाणूजन्य रोगांवर उपचार म्हणून प्रतिजैविकांचा वापर करण्यात येतो.- आजारी पक्षी वेगळे काढावे. मृत पक्ष्यांना जाळून टाकावे.- दूषित पाणी व खाद्य नष्ट करावे.- ऑल इन ऑल आऊट व्यवस्थापन पद्धत राबवावी.- शेडचे फ्युमीगेशन (३० मि.लि. फॉर्मेलीन व २० ग्रॅम पोटॅशिअम परमँगनेट) करावे.
लसीकरण- पिल्ले आणल्यानंतर सहाव्या दिवशी लासोटा लस डोळ्यांतून एक थेंब द्यावी व त्यानंतर बूस्टर डोस सहाव्या आठवड्यात पाण्यातून देऊन लसीकरण करावे.- अंडी देणाऱ्या पक्ष्यांमध्ये दर सहा आठवड्यांनी पाण्यातून लसीकरण करावे.- लस सहाव्या आठवड्यात व बूस्टर डोस १५ व्या आठवड्यात इंजेक्शनद्वारे पंखाखाली द्यावी.- पक्ष्यांना लसीकरणापूर्वी दोन ते तीन दिवस आधी पाण्यातून जंतनाशक औषध द्यावे.
डॉ. उमा तुमलामडॉ. मृणालीनी बुधेपशुसुक्ष्मजीवशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा