Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > world egg day: तंदुरूस्त राहण्यासाठी वर्षाला किती अंडी खावीत? जाणून घ्या

world egg day: तंदुरूस्त राहण्यासाठी वर्षाला किती अंडी खावीत? जाणून घ्या

world egg day 2023: How many eggs should be eaten per year to stay healthy? | world egg day: तंदुरूस्त राहण्यासाठी वर्षाला किती अंडी खावीत? जाणून घ्या

world egg day: तंदुरूस्त राहण्यासाठी वर्षाला किती अंडी खावीत? जाणून घ्या

जागतिक अंडी दिन (world egg day) हा साधारणतः १९९६ पासून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो.

जागतिक अंडी दिन (world egg day) हा साधारणतः १९९६ पासून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो.

शेअर :

Join us
Join usNext

चांगल्या मानवी आरोग्याच्या परिणामांना समर्थन देण्यासाठी अंड्याची अविश्वसनीय शक्ती आणि लोकांच्या उपजीविकेसाठी त्याचे महत्त्व साजरे करण्यासाठी जागतिक अंडी दिन जगभर साजरा केला जातो. आज १३ ऑक्टोबर २०२३ हा २७ वा जागतिक अंडी दिन म्हणून जगभर साजरा केला जात आहे.

जागतिक अंडी दिनानिमित्त अंड्याचे महत्व सांगणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आजच्या या जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारामध्ये अंड्याचे महत्व सांगण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. यावर्षीच्या जागतिक अंडी दिनाची थीम 'निरोगी भविष्यासाठी अंडी' ही आहे. अंड्याची पौष्टिकता आपणास  शक्ती आणि मानवी आहारातील पौष्टिक कमतरतेशी लढण्याची क्षमता देते. 

एक अंडे तयार होण्यासाठी 
भारतात अंड्यांचा वापर झपाट्याने वाढल्याने उत्पादनातही वाढ झाली आहे. आता भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा अंडी उत्पादक देश बनला आहे. जागतिक स्तरावर चीन हा जगातील सर्वात मोठा अंडी उत्पादक देश आहे. तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. एक संकरीत कोंबडी वर्षाला ३२०  ते ३३० अंडी घालते. अंडी घालताना कोंबडी दररोज सरासरी ११०  ग्रॅम खाद्य खाते. एक अंडे तयार होण्यासाठी २४ ते २६ तास लागतात.  

भारताची अंड्यावरील पक्षांची उपलब्धता ८५१.८१ दशलक्ष आहे. भारतात उत्पादित झालेल्या अंड्यांची संख्या १९५०-१९५१ मध्ये १.८३ अब्ज वरून २०२१-२२ मध्ये १२९ अब्ज झाली आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही भारतातील सर्वात जास्त अंडी उत्पादक राज्ये आहेत तर महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. साधारणतः १९५०-५१ मध्ये प्रति व्यक्ती 5 अंड्यांची उपलब्धता होती, जी २०२१-२२ मध्ये ९५ च्या विक्रमी पातळीपर्यंत वाढली आहे. म्हणजेच आता देशात अंड्यांची उपलब्धता प्रति व्यक्ती ९५ झाली आहे. 

आज संतुलित आहार काळाची गरज बनली आहे. संतुलित आहार म्हणजे शरीराचे योग्य पोषण व्हावे, ते कार्यक्षम आणि निरोगी राहावे, यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ आहारात असावेत, शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील, असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत, अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. संतुलित आहाराला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. अंड्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. 

अंडे  हे आपल्या दैनंदिन आहारात  विविध प्रकारे वापरले जाऊ शकते. सकाळी हक्काचा, झटपट बनणारा, पौष्टीक आणि पोटभर नाष्टा म्हणजे अंडं. त्यामुळेच ऑमलेट, बॉइल्ड एग किंवा अंड्याचे इतर पदार्थ जगभरात अनेकांच्या ब्रेकफास्टचा कायमचा घटक बनले आहेत.

आज प्राणीजन्य प्रथिनांमध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि ज्यामध्ये उत्तम प्रतीची मानवाच्या आहारात आवश्यक असलेली सर्व अमिनो आम्ले भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे अंडी. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे.

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. एका अंड्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे ६.३  ग्रॅम प्रथिने असतात आणि त्यामध्ये आपल्या शरीरास अत्यावश्यक असणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ले समाविष्ट असतात. तसेच ५  ग्रॅम स्निग्ध पदार्थ, ०.६ ग्रॅम पिष्टमय पदार्थ, १० प्रकारची जीवनसत्वे, ११  प्रकारची खनिजे अंड्यामध्ये समाविष्ट असतात. तसेच एका अंड्या मधून ७५-८० कॅलरी ऊर्जा प्राप्त होते. 

अंड्यामध्ये काहीसा पारदर्शक म्हणजे पांढरा भाग आणि पिवळा भाग ज्याला आपण बलक संबोधतो असे दोन भाग असतात. त्यापैकी अंड्याच्या पांढर्‍या भागात प्रथिने समाविष्ट असतात. मानवांसाठी, अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनेचा एक उत्तम स्रोत आहे. अंड्यांच्या प्रथिनांमध्ये अँटीऑक्सिडंट्स जसे की फॉस्विटिन, ओहोफेरिन आणि ओव्हलब्युमिन असतात. ही प्रथिने धातूला बांधून किंवा स्कॅव्हेंजिंग फ्री रॅडिकलला बांधून लिपिड ऑक्सिडेशन रोखू शकतात.

अंडी अँटीऑक्सिडंटचा संभाव्य नैसर्गिक स्त्रोत म्हणून वापरली जाऊ शकतात, जी अन्न किंवा सौंदर्यप्रसाधने उद्योगात पुढे वापरली जाऊ शकतात. अंड्यांचे अँटिऑक्सिडेंट कार्य मानवांना मोठ्या संख्येने शरीरामध्ये होणाऱ्या डीजेनेरेटिव्ह प्रक्रियेपासून रोखू शकते. ही प्रथिने पचनास सुलभ असल्याने ती पूर्णपणे शरीरात शोषली  जातात. आपले शरीर या प्रथिनांचा पूर्णपणे वापर करू शकते. याचाच अर्थ अंड्यामध्ये असलेली प्रथिने वाया न जाता १०० % वापरली जातात.

शरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः बनवून शकणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ले अंड्यामध्ये आढळून येतात. अंड्यामधील प्रथिने अत्युच्च दर्जाची असतात. इतर कोणत्याही प्रथिनयुक्त अन्नाचा  दर्जा ठरविण्यासाठी अंड्यातील प्रथिने मानक म्हणून वापरली जातात. जागतिक आरोग्य संघटनेने मानवांसाठी सर्वोत्तम प्रथिने म्हणून अंड्याला १००  गुणांचे मानांकन दिले आहे.

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये मुबलक असणारे अल्बमिन नावाचे प्रथिन पेशींच्या निर्मितीसाठी आणि वाढीसाठी गरजेचे असते. अंड्यातील प्रथिने पचनास हलकी असल्यामुळे आबालवृद्धांना अंडे पोषक असते. आपल्या स्नायूंचे बळ वाढवण्यासाठी अंड्यातील प्रथिने आवश्यक असतात. अंड्याच्या पांढर्‍या भागात रिबॉफ्लाविन म्हणजेच जीवनसत्व ब २  भरपूर प्रमाणात आढळून येते. आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये, पेशींच्या निर्मितीमध्ये आणि शरीरामध्ये घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये हे जीवनसत्व महत्त्वाचे असते. 

अंड्यातील पिवळ्या बलकाबाबत अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. जसे की बलकाचे सेवन हृदयासाठी वाईट असते, बलकामुळे ऍलर्जी येऊ शकते, कोलेस्ट्रॉल वाढू शकते इत्यादी. हे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात अंड्याच्या पिवळ्या बलकामधून आपणास भरपूर प्रमाणात पोषणतत्वे मिळतात. अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रथिनांचा साठा वगळल्यास अन्य सर्व पोषकद्रव्ये पिवळ्या बलकातच असतात. अंड्यातील जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्‍यक असतात. बलकामध्ये समाविष्ट असलेली जीवनसत्वे ही अँटिऑक्सिडंट म्हणून आपल्या शरीरामध्ये कार्य करतात.

बलकामध्ये असलेले लोह शरीरात पूर्णतः वापरले जाते. तसेच बलकात सापडणारे कोलीन नावाचे द्रव्य मेंदूच्या वाढीमध्ये मदत करते. त्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती व आकलनशक्ती सुधारण्यास अंड्याच्या पिवळ्या बलकाचा उपयोग होतो. आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी बलकाची मदत होते. अंड्यामध्ये असणारे अ जीवनसत्व आणि कॅरोटेनोईड पिगमेंट दृष्टीसाठी उपयुक्त ठरते. ड जीवनसत्व आणि कॅल्शियम खनिज हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असते.

जीवनसत्त्व ड चा मुख्य स्रोत म्हणून अंडी ओळखली जातात. जीवनसत्त्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत किंवा ठिसूळ होतात. अंड्याच्या पिवळ्या बलकाचा मध्ये आढळणारे लुटीन आणि जीयाझेनथीन नावाची कॅरोटेनोईड पिगमेंट डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंड्यातील जीवनसत्त्व-अ, जीवनसत्त्व ब-१२ आणि सेलोनियम फायदेशीर आहे. अंड्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला उत्तेजन देतात.

अंड्यास ओमेगा ३ फॅटी आम्लाचा प्रमुख स्त्रोत म्हणूनही ओळखले जाते. हे आम्ल मेंदूचे कार्य आणि दृष्टी राखण्यास मदत करते. मासे न खाणाऱ्या लोकांसाठी अंडी ओमेगा-३ फॅटी आम्लाचा मुख्य स्रोत आहे. अंड्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. तेलकट त्वचेपासून कोरड्या त्वचेपर्यंत सर्व प्रकारच्या त्वचेवर अंड्याचा सुपरिणाम दिसून येतो. अंड्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो.

अंड्यामधील फॅटी अॅसिडमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. त्वचेतील सैलपणा कमी होतो. म्हणून अंड्याला  एंटी एजिंगसाठी वापरले जाते. अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

अंड्यांमध्ये सेलेनियम, तसेच जीवनसत्त्वे अ, ब आणि के असतात. यामुळे कोविडशी लढण्यास आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. अंड्यांमध्ये अमिनो आम्ल आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात जे रुग्णांना विषाणूचा सामना करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यास मदत करू शकतात. त्यामुळेच कोविड रुग्णांना अंडी खाण्याची शिफारस केली जाते.

विकसनशील देशांमध्ये शालेय आहार कार्यक्रमांना लोकप्रियता मिळाली आहे. अंडी सूक्ष्म पोषक द्रव्ये आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहेत त्यामुळे लहान मुलांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी अंड्याचा वापर करता येतो. आजारातून बऱ्या झालेल्या व अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया तसेच वयात येणारी मुले मुली यांच्या आहारात उकडलेल्या अंड्यांचा नियमित वापर केल्यास फायदेशीर ठरते. अंडे हे सहज पचते आणि सर्व वयोगटासाठी विविध पोषण तत्त्वांसाठी उपयुक्त आहे. अंडे हे एक विविध उपयोगी अन्नपदार्थ आहे. अंडे असंख्य प्रकारे चविष्ट बनवून अत्यंत आनंददायीप्रमाणे आपल्या आहारात वापरता येते. तर मित्रहो आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये कमीत कमी एका उकडलेल्या अंड्याचा सेवनासाठी वापर करावा.

डॉ. विजयसिंह लोणकर
डॉ. अविनाश कदम

सहाय्यक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

Web Title: world egg day 2023: How many eggs should be eaten per year to stay healthy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.