अरुण बारसकर
सोलापूर : काही वर्षांखाली जिल्हात वाड्या-वस्तीवरही सहकारी संस्था सुरू करण्यासाठी चढाओढ लागलेली दिसायची. मात्र, सध्या या उलट परिस्थिती असून, सहकार जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे दिसत आहे.
कायमस्वरूपी बंद असलेल्या जिल्ह्यातील १८० दूध, तर ११४ पशु संस्थांची नोंदणी सहकारी संस्था (दूध) च्या सहायक निबंधक वैशाली साळवे यांनी रद्द केली आहे. आता कागदोपत्री ४४६ संस्था दिसत असल्या तरी मोजक्याच सहकारी संस्था सुरू असल्याचे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात दूध, मच्छ, पशु व कुक्कुटपालन अशा चार हजारांहून अधिक सहकारी संस्था होत्या. हळूहळू दूध व्यवसाय खासगी मालकांच्या हातात गेल्यानंतर सहकारी दूध संस्था बंद होण्यास सुरुवात झाली. मागील मार्च २०२३ मध्ये ५३३ सहकारी दूध संस्था होत्या. आता सुरू असलेल्या दूध संस्थांची संख्या ३३३ इतकी झाली आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन खात्याचे उपसचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन खात्याच्या बैठकीत बंद असलेल्या सहकारी संस्थांची नोंद रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दूध संघांनी माहिती दिल्यानंतर १८० दूध व ११४ पशुसंवर्धन संस्थांची नोंद रद्द करण्यात आली आहे.
अधिक पैशाचे साधन..
मच्छ संस्था या अधिक पैसे मिळणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळेच इतर सहकारी संस्थांचे फलक कधीच निघून पडले असताना मच्छ संस्था या आजही टिकून आहेत. सलग तीन-चार वर्षे पाऊस चांगला पडल्याने व उजनी धरणाचे पाणी जिल्ह्यातील काही तलावात सोडले जात असल्याने संस्थांना मच्छ संस्थांच्या माध्यमातून चांगले पैसे मिळाल्याचे सांगण्यात येते.