पुणे : मान्सूनचा हंगाम सुरू झाला असून राज्यभर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांमुळे शेतकऱ्यांनी प्राण्यांची काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडूनही यावर मात करण्यासाठी खबरदारी घेतली जाते. तर पावसाळ्याच्या तोंडावर पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी २१ जून रोजी लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली या चार जिल्ह्यांतील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
दरम्यान, मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण विचारात घेऊन चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली असून चाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी चारा बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्व जनावरांचे लसीकरण आणि जनावरांचा डेटा भारत पशुधन प्रणालीवर अपडेट करण्यासाठी या बैठकीत निर्देश देण्यात आलेले आहेत. वटपौर्णिमेच्या निमित्ताने पशुसंवर्धन आयुक्तांच्या हस्ते वडाचे झाड लावण्यात आले. यावेळी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे हेही उपस्थित होते.
काय घडले बैठकीत?
- लातूर जिल्ह्यातील पशुपालकांना चारा टंचाई निवारणार्थ खरीप -2024 हंगामात लागवड करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात संकरित शुगर ग्रेज ज्वारी व मॅक्स सायलेज मका बियाणाचे 100% मोफत वाटप करण्यात आले.
- (NDLM) भारत पशुधन प्रणालीचे महत्त्व, त्यानुसार दैनंदिन कामाच्या नोंदी अपलोडिंग, e-Prescription ची आवश्यकता, OWNER'S IDs चे सत्यापन (VERIFICATION) याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. NDLM डेटा दररोज अपडेट करण्याचे निर्देश दिले, अन्यथा संस्था प्रमुखांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
- प्री-मान्सून लसीकरण तसेच PPR, FMD, LSD व BRUCELLA लसीकरण ऑनलाईन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. लातूर जिल्ह्यातील BRUCELLA लसीकरण कमी असल्याबाबत नापसंती व्यक्त केली.
- प्रत्येक पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांनी परिशिष्ट - अ भरून देण्याबाबत तसेच तपासणी बाबत आदेश दिले.
- प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक रितीने काम करून खात्याची प्रतिमा (IMAGE BUILDING) निर्माण करावी, जास्तीत जास्त बातम्या जिल्हा महिती अधिकाऱ्यांमार्फत देण्याच्या सूचना दिल्या.
- जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, लातूर या संस्थेतील सोनोग्राफी, X-RAY व प्रयोग शाळेची पाहणी करून कामात वाढ करण्याच्या सूचना दिल्या.