गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दुधासाठी 5 रुपये अनुदान मिळावे या मागणीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुधासाठी शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी संघाना दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का? हे पाहावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दूध दर अनुदानची घोषणा केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारची मंत्री मंडळ बैठक पार पडली. त्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या बैठकीत महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले. यात दुधासाठी शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघाकडे दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून पाच रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान ही अनुदान योजना राज्यातील फक्त सहकारी दुध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असून, याकरीता सहकारी दुध संघांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ करीता प्रतिलिटर किमान 29 रुपये दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर ५ रुपये अनुदान बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले होते. महत्वाचे म्हणजे ही योजना एक जानेवारी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर सरकार या योजेनचा आढावा घेऊन मुदत वाढविण्यासाठी विचार करणार असल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं कुणाला मिळणार अनुदान?
गेल्या अनेक दिवसांपासून दुधाच्या दरात होत असलेल्या चढ उतारामुळे अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात आज राज्य सरकारने पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनानेच खासगी व सहकारी संघांकडून होणाऱ्या दररोजच्या दूध संकलनाची माहिती एकत्रित केली. मात्र शासनाने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक दूध हे सहकारी संघाला पुरवठा करीत आहेत. खासगी संघाला नाममात्र 27 हजार लीटर दूध दररोज दिले जाते. त्यामुळे अनुदान कुणाला मिळणार, कोण वंचित राहणार हे चित्र समोर आहे.
संबधित बातम्या :
‘अमुल’ला राज्यात पायघड्या; सरकारला 'महानंद दूध' वाचवण्यात अपयश!