सोलापूर : जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यांत सात कोटींहून अधिक लिटर दूध संकलन झालेल्या सोलापूर जिल्ह्यात अवघे पावणेदोन कोटी लिटर दुधाचे अनुदान आतापर्यंत मिळाले आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी अनुदान मिळविण्यात बाजी मारली आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाखांहून अधिक लिटर दूध विविध दूध संस्थांकडे संकलित होते. मागील मार्च महिन्यापासून दूध खरेदी दरात हळूहळू दूध दर २६-२७ रुपयांवर खाली आला.
अनेक महिने गेले; मात्र दूध खरेदी दरात वाढ काही झाली नाही. इकडे पशुखाद्य, हिरवा चारा व इतर खर्चात वाढ झाली. दुधाला प्रति लिटर २६ रुपये दर परवडेना झाल्याने शासकीय अनुदान मागणी झाली.
राज्य शासनाकडून जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांसाठी अनुदान जाहीर झाले. राज्याचे पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी गाईंना टॅगिंग केले तरच अनुदान देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे दूध अनुदान घेण्यासाठी दूध संघांना भाग घेण्यासाठी लॉगिन आयडी, पासवर्ड देण्यात आले.
पासवर्ड मिळालेल्या दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गायीची फाईल अपलोड करणे बंधनकारक होते. हे काम ज्या संस्थांनी पूर्ण केले त्या संस्थांना दूध घालणाऱ्या संस्थांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात एका महिन्यात साधारण साडेतीन कोटी लिटर म्हणजे दोन महिन्यात ७ कोटी लिटर दूध विक्री झाले आहे. अनुदान मात्र एक कोटी ७६ लाख लिटर दुधाचे ८ कोटी ७९ लाख रुपये मिळाले आहे.
(लिटर व रक्कम कोटीत आहे)
जिल्हा | शेतकरी | लिटर | रक्कम |
सोलापूर | ७,५७२ | १.७६ | ८.७९ |
अहमदनगर | ८०,७०८ | १३.१३ | ६५.६५ |
पुणे | ८२,५६७ | १५.७६ | ७८.७८ |
कोल्हापूर | ५८,०३५ | ४.८ | २०.३८ |
सांगली | १८,०१७ | २.२ | १०.१५ |
सातारा | १६,९३० | ३.२० | १५.९९ |
नाशिक | ८,८७४ | १.२५ | ६.२३ |
अधिक वाचा: एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान