जगदीश कोष्टी
सातारा : साताऱ्यासोबतच राज्याच्या सर्वच भागात उष्णतेचा पारा वाढत आहे. सरासरी चाळीस अंश सेल्सिअसवर पारा गेलेला असतानाही गावोगावच्या यात्रांमध्ये बैलगाडी शर्यतींचा धुरळा उडत आहे. तळपत्या उन्हातून अनेकजण वावरातून अनवाणीही बैलांमागे धावत आहेत. त्यांना हौसेपुढे कडक उन्ह, अंगातून निघणाऱ्या घामांच्या थारांकडेही लक्ष नसल्याचे जाणवत आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा प्रामुख्याने कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. या भागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून वाहत असलेल्या नद्या, मोठमोठ्या धरणांमुळे परिसर बागायती झाला आहे. काळ्या कसदार जमिनीमुळे या परिसरातील बळीराजाही सधन आहे.
उन्हाळ्यात त्यांना कामही कमी असते. त्यामुळे गावोगावी याच काळात यात्रा भरत असतात. या यात्रांमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. बळीराजासाठी सर्जाराजा म्हणजे जणू जीव की प्राण, सुकाळ असो वा दुष्काळ सर्जाराजा बळीराजाची कायमच सोबत करीत असतो.
त्यामुळे गावोगावी यात्रांतून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. या शर्यती पाहण्यासाठी लांबलांबून लोक येत असतात. दरवर्षी साधारणतः मार्चमध्ये भरणाऱ्या यात्रा यंदा अधिक महिना आल्याने काहीशा पुढे गेल्या आहेत. त्यामुळे एप्रिलमध्येच यात्रा सुरू आहेत.
हा हंगाम आणखी पंधरा दिवस तरी चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या हंगामात पाऊस खूपच कमी झालेला असल्याने यंदा प्रमाणापेक्षा जास्त दुष्काळ पडलेला आहे. गावोगावी पाणीटंचाई जाणवत आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
या परिस्थितीत पाठीमागे लागणारा शेकडो लोकांचा जमाव, अधून-मधून पडणारा फटका शर्यत पूर्ण करताना बैलांची मात्र पुरती दमछाक होते.
थेट प्रक्षेपण असताना मैदानात
- सध्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार बैलगाड्या शर्यतीचे थेट प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे मोबाईल, संगणकावर ते पाहता येते. त्यामुळे कडक उन्हात घरात सावलीला बसून पाहणे सहज शक्य आहे.
- तरीही हजारो रसिक मंडळी लहान-लहान गावातील यांत्रांमध्ये भरत असलेल्या बैलगाड्या शर्यंती पाहायला जात असतात.
- कारण त्यासाठी बैलगाडा शर्यतीचा नादच असावा लागतो अन् सातारा जिल्ह्यातील तरुणांना तो नक्कीच आहे, अशी माहिती धावडशी येथील विवेक पवार यांनी दिली.
म्हणून 'ग्रीननेट'चा मांडव
ऊनच एवढे कडक पडत आहे की माणसांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे जिथं सावली मिळेल तिथ माणस झाडाच्या सावलीत बसत असतात. मुक्या जितराबाचं हाल होऊ नयेत म्हणून कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी हिव्या कापडांचा मांडव घातला जातो. त्यात त्यांना बांधले जाते.
खायला हिरवा चारा
उन्हामुळे जनावरांना चारा खाऊ वाटत नाही. तसेच आतून बाहेरून उष्णता जाणवते. त्यामुळे त्यांच्यासाठी बैलगाडी मालकच सोबत हिरवा मका, हत्ती घास, कडवळ आणत असतात. हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांच्या तोंडाला कोरड पडत नाही.
बैलांचे तोंड धुण्यासाठी बाटलीबंद थंड पाणी
कडक उन्हात सावलीला थांबले तरी अंगाची लाहीलाही होत असते. या उन्हात बैलं पळणार म्हटल्याच्या त्यांच्या जीवही कासावीस होत असतो. पण, हे त्याच्यावर प्रेम करणारे जाणून असतात. त्यामुळे बैलांचे तोंड धुण्यासाठी बाटलीबंद थंड पाण्याचा वापर केला जातो.
अधिक वाचा: उन्हाळा वाढतोय जनावरांना पाण्याबरोबर काय द्याल ज्यामुळे टळेल उष्माघात