वाढते यांत्रिकीकरण, महागाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे बनले आहे. यामुळे बैलांची संख्या गावोगावी मोठ्या प्रमाणात घटत आहे. मात्र, केडगावचे संतोष रंगनाथ कोतकर यांच्या कुटुंबाला तीन पिढ्यांपासून बैलांचा लळा baiopola आहे. प्रत्येक पोळ्याला दीड ते दोन लाखांची नवीन बैलजोडी घेऊन त्यांना कुटूंबाप्रमाणे जीव लावतात. महिन्याला ५० हजार रुपयांचा खुराक मोकळ्या मनाने त्यांच्यावर खर्च करतात. बैल सांभाळण्याची त्यांची हौस औत्सुक्याचा विषय बनला आहे.
शेतातील कामात यांत्रिकीकरण वाढत चालले आहे. जनावरांचा खुराकही महाग झाला आहे. त्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. यामुळे ग्रामीण भागात बैलजोड्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र, केडगाव येथील संतोष रंगनाथ कोतकर या शेतकरी कुटुंबाला बैलांचा विशेष लळा आहे. तीन पिढयांपासून हे कुटुंब बैलांची सेवा करणे, त्यांना घरच्यासारखा जीव लावण्याचे काम करीत आहेत.
दररोज ३२ किलो पेंड
लाखो रुपये खर्च करून आणलेल्या बैलजोडीला ते लाडक्या पोराप्रमाणे हौसेने खर्चही करतात. दिवसभरात ३२ किलोंची पेंड, सकाळ-संध्याकाळ वैरण, घास, कुट्टी तसेच सर्व प्रकारचे खाद्य बैलांना खाऊ घालतात. सकाळी गावरान तुपात मळलेल्या गव्हाच्या पिठाचे गोळे करून ते लाडक्या सर्जा-राजाला खाऊ घालतात. दर १५ दिवसांनी २५० ग्रॅम मोहरीचे तेल त्यांना पाजण्यात येते. महिन्याला ५० हजार रुपयांचा खर्च केवळ सर्जा-राजाच्या प्रेमापोटी ते करतात.
बैलांसाठी फॅन अन मॅटही
सर्जा-राजाची बडदास्त ठेवण्याची कोणतीच कसर कोतकर परिवार ठेवत नाही. दर दोन दिवसांनी त्यांना स्वच्छ आंघोळ घालणे, त्यासाठी दोन-तीन तास कष्ट घेणे, हे त्यांच्या नेहमीच्या कामातीलच भाग बनला आहे. बैलांसाठी गोठ्यात फॅन बसविण्यात आले आहेत. तसेच त्यांना बसण्यासाठी मॅट अंथरण्यात आले आहेत.
सध्याच्या महागाईच्या काळात बैलजोडी सांभाळणे परवडत नाही. मात्र, आम्ही हौस व बैलांवर असणारा जीव म्हणून हा सर्व खर्च करतो. घरातील सर्वांना सर्जा-राजाचा लळा होतो. सर्वजण वर्षभर त्यांची काळजी घेतात. त्यांना जीव लावला की त्यांचाही आपल्यावर जीव राहतो. आमच्या घरात जुन्या काळापासून बैलांवर माया करण्याची परंपरा आहे. आम्ही ती पुढे चालवत आहोत. - संतोष रंगनाथ कोतकर, शेतकरी, केडगाव