तापमानात घट झाल्याने थंडी वाढली असून, गार वारेही सुटले आहे. त्यामुळे गल्लोगल्ली दिवसाच शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. या थंडीच्या लाटेत गोठ्याला ताटवे लावत जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
गत वीस दिवसांपूर्वी वातावरण ढगाळ होते. आता चार-पाच दिवसांपासून गार वारे सुटले आहे. पहाटे पाच वाजेदरम्यान गार वाऱ्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवसभर अंगातील स्वेटर काढावे वाटत नाही. अनेक ठिकाणी दिवसाही शेकोट्या पेटवून नागरिक शेकताना दिसत आहेत. या थंडीमुळे जनावरांनाही त्रास जाणवू लागला आहे. अशावेळी पशू पालकांनी गोठ्याच्या चारही बाजूला ताटवे व बोंदरे लावून गोठा उबदार करावा, जेणेकरून जनावरांचा थंडीपासून बचाव होईल. मोठी जनावरे थंडीचा सामना करू शकतील. परंतुनवजात वासरांना थंडीचा त्रास अधिक पालकांनी वासरांची काळजी घेणे जाणवू शकतो. अशावेळी पशू गरजेचे आहे.
जनावरांना उघड्यावर बांधू नये
चार दिवसांपासून गार वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे, अशावेळी पशू पालकांनी जनावरांना उघड्यावर बांधू नये. सकाळ, दुपार व सायंकाळ गोठ्यातच बांधून ठेवावे. थंडीच्या दिवसात नदीवर, ओढ्यावर पाणी पाजू नये, गोठ्यातच जनावरांच्या अंगावर सुती पोते टाकावे. तसेच गोठ्यातच सुती पोते अंथरावे, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे,
विविध आजारांची शक्यता
थंडीमुळे जनावराना विविध आजारांची शक्यता असते. वाढत्या थंडीमुळे जनावरांना काम करणे शक्य होत नाही. अशावेळी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. कुरुंदा व परिसरातील पशुपालकांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी आदी जनावरांची थंडीच्या दिवसांत काळजी घ्यावी व उघड्यावर बांधू नये.
जनावरांना वेळेच्यावेळी आहार द्यावा
थंडीचे वातावरण पाहता पशू पालकांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांत जनावरांना भूक लवकर लागते. अशावेळी वेळेच्यावेळी कडबा, पेंड खाऊ घालावी. थंडीमुळे जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी वेळेवर दवाखान्यात घेऊन जावे. -डॉ. गौतम खिल्लारे, पशुवैद्यकीय अधिकारी
वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी
केंद्रा (बु.): मागील चार दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. सायंकाळी पाच वाजेपासूनच गल्लीबोळात शेकोट्या पेटताना पाहायला मिळत आहेत. थंडीची चाहूल लक्षात घेऊन बाजारात कानटोपी, मफलर, ब्लॅकेंट, स्वेटर आदी उबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. थंडीची लाट दोन दिवसांपासून वाढली असून लहान मुले व ज्येष्ठ मंडळींची कुटुंब प्रमुखांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.