दोन वर्षांपासून गायदूध खरेदी दरात उत्पादनात खर्चाचा विचार करता कोणत्याही प्रकारची भरघोस वाढ न होता घटच झाली आहे. म्हैस दूध खरेदी दरात थोडीफार वाढ झाली आहे; मात्र खर्चही अव्वाच्या सव्वा व वाढला आहे. पशुखाद्याच्या दरात तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. उत्पादन खर्चात सरासरी ५० टक्के वाढ झाल्यामुळे दूध व्यवसाय मोठ्या वर अडचणीत सापडला आहे. उत्पादन या घटूनदेखील खरेदी दरात कोणतीही वाढ होत नाही. त्यातच उत्पादन खर्च भरमसाट वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.
राज्यातील सरकारने गाय दूध खरेदीसाठी फॅट ३/५ व ८/५ 'एसएनएफ साठी ३४ रुपये दर निश्चित केला. अधूनमधून सर्वच दूध संघांकडून दूध दरात घटच केली जात आहे. म्हैस दूध खरेदी दरात गेल्या पाच वर्षांत फक्त सात रुपये वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता ही वाढ नगण्य आहे. कोरोना, महापूर, दुष्काळ अशी अनेक संकटे सहन करीत दूध उत्पादक शेतकरी टिकून राहिला आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे दूध व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे.
पशुखाद्य व औषधोपचारात ४० टक्के वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत मजुरीचे दर दुप्पट वाढले आहेत. दूध उत्पादकांना दुधापासून मिळणारे उत्पन्न गेल्या दोन वर्षांत स्थिर राहिले आहे. वाढती महागाई व दुधातून मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनेक दूध उत्पादकांनी दुभत्या जनावरांची विक्री करून या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
चाळीस रुपयावर दर मिळणे गरजेचे
गाय दुधास ३४ रुपये दर शासनाने ठरवून दिला आहे. मात्र, उत्पादन खर्चाच्या दृष्टीने सरासरी ४० रुपयावर दर मिळणे गरजेचे आहे. सध्या सरकी गोळी ३० ते ३५ रुपये किलो मिळत आहे. त्या प्रमाणात दुधालाही दर मिळणे गरजेचे आहे.