जुन्नर तालुक्यात दरवर्षी सुमारे ७० ते ८० हजार टन मुरघास बनवला जातो. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी बहुधा मुरघासाची निर्मिती करतात. तालुक्यातील सुमारे १ लाखांपेक्षा अधिक जनावरे आहेत. या जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे.
जुन्नर तालुक्यात सध्या ६ ते ७ हजार रुपये टन या दराने मुरघासाची विक्री होते. एकंदर तालुक्यातील शेतकरी ३६ ते ३७ कोटी रुपयांचा मुरघास जनावरांसाठी घरच्या घरी बनवतात. तालुक्यातील शेतकरी मुरघास निर्मिती शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करतात. मुरघास बनवण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, हत्तीगवत इत्यादींचा वापर तालुक्याच्या पूर्व करतात.
भागात शेतकऱ्यांमध्ये मुरघास बनवण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. हिरव्या चाऱ्यापासून नियंत्रित किण्वन प्रक्रियेचा वापर करून तयार करण्यात येणारे जास्त आर्द्रता असणारा पशु आहार म्हणजे 'मुरघास', मुरघासात कमीत कमी २० ते ४० टक्के शुष्क पदार्थ, १४ ते १६ टक्के क्रूड प्रोटिन्स असतात.
वर्षभर टिकून राहणारा चारा
मुरघास वर्षभर चांगल्या स्थितीत राहतो. काही शेतकरी ही मका विकत घेऊन यापासून मुरघास तयार करून ठेवतात. एकरी १० ते १३ हजार रुपये किमतीने मका विकत घेऊन शेतकरी जनावरांसाठी हा मुरघास बनवतात. या काळात मका उत्पादक शेतकऱ्याला मक्याच्या कणसाचे पैसे होतात तसेच कणसे काढल्या नंतर राहिलेली मका मुरघासासाठी विक्री करता येते.
मुरघास बनवण्याचे प्रमाण तालुक्यात पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागात अधिक आहे. जवळजवळ सर्व शेतकरी मुरघास बनवतात. अचानक दुष्काळ पडला किंवा पाणी टंचाईच्या काळात सुद्धा मुरघासाच्या माध्यमातून १२ ही महिने हिरवा ओला व पौष्टिक चारा उपलब्ध होतो. मुरघासात तयार होणारे लॅक्टिक आम्ल हे गायी व म्हशीच्या पचनेंद्रियात तयार होणाऱ्या रसासारखे असते म्हणून मुरघास हा पचनात सोपा असतो. मुरघासामुळे जनावरांची भूक वाढते त्यांच्या चयापचयात बिघाड होत नाही त्यामुळे दुधाची गुणवत्ता व उत्पादन वाढण्यास मदत होते. - गणेश शिंदे, मुरघास बनविणारे शेतकरी
अधिक वाचा: उन्हाळा वाढतोय जनावरांना पाण्याबरोबर काय द्याल ज्यामुळे टळेल उष्माघात