कणगी म्हणजे धान्य साठविण्याची एक रचना. टोपली जशी बांबूपासून बनवितात तशीच कणगीदेखील. कणगीचा आकार हा रांजणासारखा असतो. तळापासून व्यास एका उंचीपर्यंत वाढता आणि त्या नंतर निमुळता होत जातो. कणगी आतून बाहेरून शेणाने लिपली जाते आणि उन्हात वाळवतात.
त्यात खरीप, रब्बी हंगामात धान्य वाळवून भरतात. थोडी रिकामी ठेवून वरतून पुन्हा शेणाने हवाबंद होईल, अशा प्रकारे लिपतात. शीतगृहे येण्यापूर्वी अन्न धान्य टिकवून ठेवण्याच्या परंपरागत पद्धतीत कणगीचे स्थान महत्त्वाचे होते. तिची जागा प्लास्टिक ड्रमनी घेतली आहे. आजही ग्रामीण भागात कणगी वापरली जात आहे.
अधिक वाचा: शेतकरी बांधवांनो, धान्याच्या घरगुती कोठीसाठी अनुदान मिळतेय, असा घ्या लाभ
कणगी म्हणजे धान्य, शेतीमाल, गुरांचा चारा, कांदे साठवण्यासाठी केलेली तात्पुरती सोय, ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या साहित्यातून कणगी तयार केली जाते. धान्य शेतातून कापणी केल्यानंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता कायम ठेवणे खूप जिकिरीचे असते. शेतकरी धान्य साठविण्यासाठी बांबूच्या किंवा वेताच्या टोपलीला बाहेरून शेण किंवा मातीचा थर लावतो. त्यामुळे त्याचे छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किड्यांपासून धान्याचे संरक्षण होते.