कोंबड्याच्या निरोगी स्वास्थ्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. नियमितपणे लसीकरण न केल्यास रोगाची लागण होते. ठराविक रोगाचा प्रसार होण्यापूर्वी शिफारशीनुसार नियोजित लसीकरण करणे आवश्यक आहे.
मॅरेक्स, रानीखेत (मानमोडी), गंबोरो, फाऊलपॉक्स यासारख्या विषाणूजन्य रोगांचा उपचार होणे शक्य नसल्याने पक्ष्यांना लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.
- गंबोरो, मरेक्स यासारख्या रोगांमुळे मांसल कोंबड्यांतील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. तसेच त्यांच्या वजनातसुद्धा घट होते. अंडी देणान्या कोंबड्यांमध्ये गंबोरा, रानीखेत, एग ड्रॉप सिंड्रोम या रोगांमुळे अंडी देण्याचे प्रमाण कमी होते. अंड्याचे कवच पातळ होते, तसेच अंड्याच्या आतील गुणधर्मावरसुद्धा परिणाम होतो म्हणून पक्ष्यांना शिफारशीनुसार लसीकरण करावे.
- पैदासीच्या कोंबड्यांमध्ये रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती बाढावी म्हणून लसीकरण करणे गरजेचे आहे. याचा फायदा म्हणजे अशा कोंबडीच्या पिल्लांना आईकडून मिळणान्या रोगप्रतिकारकशक्तीद्वारे गंबोरा, रानीखेत यांसारख्या रोगांपासून काही काळ सुरक्षित ठेवता येते.
- अंडी देण्याच्या काळात पैदासीच्या कोंबडीपासून तिच्या अंड्यातून पिल्लांना विषाणूंची लागण होऊ नये म्हणून लसीकरण करावे.
- रोगाची लागण झालेल्या कोंबडीच्या गटाला उपचार करण्यासाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी लसीकरण केले पाहिजे. कोंबडीपासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होऊ नये यासाठी लसीकरण फायदेशीर ठरते.
ब्रॉयलर पक्ष्यांचे लसीकरण
- ब्रॉयलर पक्षी बाजारात वयाच्या सहाव्या आठवडयात विकले जातात. त्यांच्या या वाढीच्या कालावधीमध्ये रानीखेत, गंबोरा रोगांची लागण होण्याची शक्यता असते म्हणून त्यांचे लसीकरण आवश्यक आहे.
- एक दिवस वयाच्या पिल्लांना मरेक्स लसीची ०.२ मि.लि. मात्रा त्वचेखाली अंडी ऊबवणी केंद्रातच टोचली जाते. अंडी ऊबवणी केंद्रात या लसीची मात्रा पिल्लांना दिलेली आहे याची खात्री करूनच पिल्लांची खरेदी करावी.
- पिल्ले प्रक्षेत्रावर आल्यानंतर सातव्या दिवशी मानमोडी रोग नियंत्रणासाठी लासोटा ही लस ०.२ मि.लि. डोळ्यात एक- एक थेंब टाकून द्यावी. त्यानंतर वयाच्या नवव्या दिवशी पक्ष्यांना गंबोरा लस डोळ्यांत थेंब टाकून द्यावी. त्यानंतर वयाच्या अठराव्या दिवशी गंबोरा लसीचा बुस्टर डोस, तर वयाच्या अठ्ठाविसाव्या दिवशी मानमोडी रोगावरील लासोटा या लसीचा बुस्टर डोस डोळ्यांत थेंब टाकून द्यावा.
- डोळ्यामधून लसीकरण करताना लसीची मात्रा ही प्रमाणापेक्षा जास्त वापरली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे लस ही सर्व पक्ष्यांना दिली आहे याची खात्री करावी. ब्रॉयलर पक्ष्यांच्या वाढीच्या काळात कमीत कमी चार लसी द्याव्यात.
अंडी देणाऱ्या पक्ष्यांमधील लसीकरण
- अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर पक्षी) विशेष लस दिली जाते. हे पक्षी साधारणतः वयाच्या बहात्तर आठवड्यांपर्यंत अंडी उत्पादनासाठी ठेवले जातात, त्यामुळे जास्त वयाच्या पक्ष्यांमध्ये रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्याचा परिणाम अंडी उत्पादनावर होतो.
- रानीखेत आणि इन्फेक्शियस ब्रॉन्कायटीस यासारख्या रोगांमुळे अंडी उत्पादन कमी होते. याचा फायदा त्यांच्या अंडी उत्पादनाच्या कालावधीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करण्यासाठी होतो.
- मांसल पक्ष्यांप्रमाणेच वयाच्या पहिल्या दिवशी लेअर पक्ष्यांना मेरेक्स लसीची ०.२ मि.लि. मात्रा, त्वचेखाली अंडी ऊबवणी केंद्रातच दिली जाते.
- पिल्ले प्रक्षेत्रावर आणल्यानंतर वयाच्या सातव्या दिवशी आणि अठ्ठाविसाव्या दिवशी मानमोडी रोग नियंत्रणासाठीची लासोटा ही लस डोळ्यात थेंब टाकून दिली जाते.
- वयाच्या नवव्या आणि अठराव्या दिवशी गंबोरा लस डोळ्यात थेंब टाकून द्यावी. वयाच्या सहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात कोंबड्यांना देवीची लस लॅनसेटच्या साह्याने पंखामध्ये द्यावी.
- इन्फेक्शिअस कोरायझा या रोगावरील ए.बी.सी. मृत लसीची ०.५ मि.लि. मात्रा छातीत टोचावी.
- वयाच्या दहाव्या आठवड्यात 'आर २ बी' ही मानमोडी रोगावरील लस ०.५ मि.लि. मात्रेमध्ये छातीत टोचावी.
- इन्फेक्शिअस ब्रोन्कायटीस या रोगाची लस वयाच्या बाराव्या आठवडयात पिण्याच्या पाण्यातून द्यावी.
- शेवटी वयाच्या सोळाव्या आठवड्यात लासोटा नावाची मृत लस ०.५ मि.लि. या प्रमाणात छातीत टोचावी.
- कोरायझा ही लस केवळ साथ पसरणाऱ्या भागात द्यावी. दर आठ आठवड्यांनी रानीखेत ही लस टोचून घ्यावी. 'आर. २ बी' लस पक्ष्यांमध्ये देण्याअगोदर जंतनाशक पाजावे.
कुक्कुटपालनशास्त्र विभाग,
क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ
अधिक वाचा: कुक्कुटपालनात सुधारित ग्रामप्रिया कोंबड्या ठरत आहेत फायदेशीर