धाराशिव जिल्ह्यात १ जानेवारीपासून पशुधनातील लाळ खुरकुत रोगावरील लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ४५ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार असून, यासाठी ४ लाख ६८ हजार २०० लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत.
पशुधनातील लाळ खुरकुत हा रोग विषाणूजन्य आहे. या आजारात पशुधनास १०५ ते १०६ डिग्रीपर्यंत ताप असतो. या आजाराने दुधाळ जनावराच्या दूध उत्पादनात घट होते. पशुधनाच्या खुरामध्ये व तोंडामध्ये जखमा होतात व त्यांचे खाणे-पिणे बंद होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते, तसेच गाभण गाय, म्हैस व शेळीचा गर्भपात होऊ शकतो. या रोगाचा प्रसार हवेतून एका बाधित पशुधनापासून दुसऱ्या निरोगी जनावरांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे.
संबंधित वृत्त- लाळ खुरकत रोग आपल्या गोठ्यात आलाय? कसे कराल नियंत्रण
लाळ खुरकुत रोगावरील लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लाळ खुरकुत या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे, तसेच जिल्ह्यातील एकही पशुधन ही लस घेण्यापासून वंचित राहू नये, अशा सूचना जिल्ह्यातील पशुसंवर्धन पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना जि. प.च्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
रोगाची लक्षणे
- रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश केल्या नंतर एक ते पंधरा दिवसात रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात. पशूंना १०२-१०६ अंश पर्यंत तीव्र ताप येतो. जनावरे चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात. एक दोन दिवसात हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सर सारखी जखम होते. या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात.
- पायातील खुराच्या मधील जखमा वेदनादायी असल्याने बऱ्याच वेळा जनावरे पाय वर धरतात. या जखमांवर माश्यांनी अंडी घातली तर तिथे अळ्या पडतात. या अवस्थेत जीवाणूंची बाधा होऊन जखमा चिघळतात व कित्येक दिवस त्या बऱ्या होत नाहीत. लहान वासरांमध्ये या रोगाची बाधा झाली तर हृदयाचे स्नायू निकामी झाल्याने ती काहीही लक्षणे न दाखविताच मरण पावतात. लहान वासरांमध्ये ५० टक्के पर्यंत मरतुक होऊ शकत असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.