उन्हाळा सुरु झाला आहे, या काळात आपण जनावरांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. या दिवसात कोणता आहार पशुंसाठी आवश्यक असतो याची माहिती असणे गरजे असते. गाईंना त्यांच्या शरिराच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के शुष्क पदार्थांची आवश्यकता असते.
म्हशींना त्यांच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थाची गरज असते. जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात.
आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे. आहार देताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यावी, जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकात एकदम बदल करू नये.
पशुआहार नियोजनाचे मुद्दे
• जनावरांना मुक्तपणे, गरजेनुसार थंड, स्वच्छ आणि निर्जंतूक पाणी उपलब्ध करा.
• पशुखाद्यात प्रती जनावरास शरीर बजनानुसार २० ते २५ ग्रॅम खाण्याचा सोडा द्या.
• शक्यतो ताक, गुळ, मीठ, क्षार मिश्रणे दररोज द्या.
• जनावरांना ऊस, ऊसाचे वाडे, वाळलेला ऊस, ऊस पाने एकूण चाऱ्याच्या २०-३० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात देवू नयेत आणि दिल्या जाणाऱ्या ऊसकुट्टी, ऊस पाने आधि एक दिवस वाळवून यावर १ टक्का चुन्याची निवळी शिपंडावी.
• उन्हाळा/चाराटंचाई या काळात मुरघास अत्यंत उपयुक्त ठरतो.
• उन्हाळ्यात पुरविल्या जाणाऱ्या सर्व वाळलेल्या चाऱ्यावर युरीया, मळी, क्षार प्रक्रिया नेहमी फायद्याची ठरते.
• चाऱ्याची कमतरता लक्षात घेता उन्हाळ्यात पशुखाद्याची मात्रा/प्रमाण वाढविणे गरजेचे असते.
• फळांच्या साली, गर, आंबा कोयी, मका विरहीत कणसे, शेवगा, फळांचा चोथा उन्हाळ्यात चारा म्हणून वापरता येतो.
• झाडपाला, हिरवी कोवळी पाने, वृक्षपाने चारा म्हणून वापरावीत यात प्रामुख्याने गिरीपुष्प (ग्लिरीसीडीया) उंबर, पिंपळ, अंजन, बोर, कडूलींब, आंबा, वड, बेल, जांभूळ, शमी, सुबाभूळ, शेवरी, तुती, केळीपाने, केळी कंद, डाळींब साली, यांचा वापर करावा.
• एकावेळी किमान ८ ते १० प्रकारचा झाड-पान चारा तीस टक्के प्रमाणात वापरावा.
• तुर/मुग/भूईमूग/हरभरा यांचे शेष/काड/तणस/पाला भाग, ऊसाचे पाचट (बगॅस), रसवंतीत उरलेला चोथा, युरीया प्रक्रिया करून वापरता येतो.
• सोयाबीन काड, गव्हाचा कोंडा, शेंगदाणा टरफले, भाताचा पेंढा, भुस्सा कुटार, सरमाड यावर युरीया प्रक्रिया उपयुक्त ठरते.
• उपलब्ध सर्व चारा, चारा पर्याय साधने कुट्टी करूनच जनावरांना पुरवावीत व कुट्टी पसरून वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.
• जनावरांच्या आहारातील कोणताही बदल हळूहळू सवयीने अवलंबवावा.
• सर्व प्रकारचे डोंगरी गवत (पवना, कूसळी मारवेल) जनावरांना चारा म्हणून वापरता येते.
• टरबूज, खरबूज साली, काकड्या, गाजर यांचा वापर पशुआहारात करता येतो.
• चिंचूके/बिया/कोयांचे पीठ ५-१० टक्के प्रमाणात पशुवैद्यकाच्या सल्याने पशुखाद्यात वापरता येते.
अधिक वाचा: वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान