सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन होऊ लागले आहे. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेत अनेक तरुण देखील मत्स्यपालनाकडे वळू लागले आहेत. याच मत्स्यपालनाबरोबरच गेल्या काही वर्षांपासून पिंजरा मत्स्य संवर्धन संकल्पना पुढे येऊ लागली आहे. शासनाच्या मत्स्यपालन विभागाकडून हि योजना राबविण्यात येत असून नेमकी काय आहे ही योजना समजून घेऊया.
बंदिस्त पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करणे ही उच्च तंत्रज्ञानावर आधारीत पद्धत असून, त्याद्वारे अधिक मत्स्योत्पादन मिळू शकते. सबब राज्यातील कुपोषणाची समस्या हाताळण्याकरीता प्रथिनयुक्त खाद्य पदार्थांची उपलब्धता वाढविण्याकरीता पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प स्थापित करुन रोजगार निर्मितीच्या उद्देशाने राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन योजनेला चालना देण्यात आली आहे.
राज्यातील जे तलाव जलाशय मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या अधिनस्त आहेत अशा तलाव / जलाशयांमधील पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांची जबाबदारी मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाची असेल तर जे तलाव जलाशय महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या अधिनस्त आहेत अशा तलाव/ जलाशयांमधील पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांची जबाबदारी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाची असेल.
सदर प्रक्रिया राबविताना लाभार्थी निवडीबाबत खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम राहील-
अ) स्थानिक मच्छिमारांची प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था
ब) स्थानिक आदिवासी मच्छिमारांची प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था
क) प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेतजमीन किंवा मोबदला देण्यात आलेला नाही, अशा प्रकल्पग्रस्तांची प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था
अर्जदाराची पात्रता काय आवश्यक?
अनुदानित योजनेतील लाभार्थनि अनुज्ञेय पिंजरा संख्येच्या पूर्ण क्षमतेनुसार पिंजरा उभारणी केल्यानंतर सदर लाभार्थ्याला व्यवसाय वृध्दी करावयाची असल्यास त्याला विनाअनुदानित पिंजरा उभारणी करिता अर्ज करणे अनुज्ञेय राहील. तसेच विनाअनुदानित योजनेतील लाभार्थनि अनुज्ञेय पिंजरा संख्येच्या पुर्ण क्षमतेनुसार पिंजरा उभारणी केल्यानंतर सुध्दा सदर लाभार्थ्याला व्यवसाय वृध्दी करावयाची असल्यास त्याला अनुदानित पिंजरा उभारणी करिता अर्ज करणे अनुज्ञेय राहील. वैयक्तिक अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्ष या वयोगटातील असणे आवश्यक आहे. मत्स्यविज्ञान क्षेत्रातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीधर तसेच शासनमान्य संस्था उदा. CIFE, CIFRI, NFDB व मत्स्य महाविद्यालय इ. यांचेद्वारे अल्प कालावधीचे प्रशिक्षण अशाप्रकारे उच्चतम शिक्षण अर्हतेच्या व्यक्तीस प्राधान्य असेल. पिंजरा पद्धती मत्स्यसंवर्धक वैयक्तीक लाभार्थी/ मच्छिमार सहकारी संस्था/संघ मच्छिमार स्वयं सहाय्यता गट/ संयुक्त दायित्व गट हे मत्स्यव्यवसाय विभागाचे थकबाकीदार नसावे.
दरम्यान या संपूर्ण योजेनची माहिती शासनाच्या मत्स्यपालन विभागाच्या https://fisheries.maharashtra.gov.in/cage-culture या संकेतस्थळावर पाहू शकता...