कृत्रिम रेतन प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची नाजूक अशी जैवतंत्रज्ञान प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पाहिल्यानंतर जे दिसते तसे इतके सोपे तंत्रज्ञान नाही. आपली गाय किंवा म्हैस जर गाभण राहायची असेल तर प्रत्येक पशुपालकाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या त्यांनी नीट पार पाडल्या तर त्यांची गाय किंवा म्हैस लवकरात लवकर गाभण राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यासाठी या सर्व प्रक्रियेत पशुपालकांचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे.
पशुपालकांच्या जबाबदाऱ्या
- प्रत्येक पशुपालकास आपल्या गाय म्हशीच्या बाबतीत त्यांचा माज केव्हा येणार आहे? त्याची लक्षणे काय दाखवते किती दिवस माज टिकतो याबरोबरच त्याची प्रजाती कोणती आहे ही माहीत असावी.
- माजावर आल्यानंतर योग्य वेळी म्हणजे सकाळी आल्यास संध्याकाळी, संध्याकाळी आल्यास सकाळी. एकूणच माजाचा कालावधी पाहून नजीकच्या पशुवैद्यकाकडे दवाखान्यात घेऊन जावे. अन्यथा त्यांना घरी बोलवावे.
- घरी कृत्रिम रेतन करण्यासाठी बोलवल्यानंतर आपण स्वतः उपस्थित राहावे व माजावर आलेल्या गाई-म्हशीस योग्य पद्धतीने मारझोड न करता बांधून घ्यावे. जेणेकरून योग्य पद्धतीने कृत्रिम रेतन करता येईल.
- कृत्रिम रेतन प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणारे गरम पाणी, स्वच्छ टॉवेल, योग्य तो सौम्य साबण न कंटाळता उपलब्ध करून द्यावा.
- गाय-म्हैस केव्हा माजावर आली, यापूर्वी केव्हा भरवली, किती वेळा भरवली, कोणी भरवली, सोट कसा आहे याबाबत सर्व माहिती संबंधित पशुवैद्यकांना द्यावी.
- सर्व प्रक्रिया पार पाडत असताना पशुपालकाने आपले पूर्ण लक्ष या प्रक्रियेकडे द्यावे व वापरलेल्या वीर्यकांडीची नोंद आपल्या नोंदवहीत करून ठेवावी.
- आपल्या गाई-म्हशीच्या कानात बारा अंकी इनाफ नंबर नसेल तर तो प्रथम बिल्ला मारून घ्यावा. जेणेकरून त्या क्रमांकासमोर केलेल्या कृत्रिम वेतनाबाबत सविस्तर नोंदी पशुवैद्यकांना करता येतील.
- कृत्रिम रेतन केल्यानंतर गाय किंवा म्हैस टांगून ठेवणे, चारापाणी न देणे, बसू न देणे, निरना खाली डागणे अशा अघोरी उपाय कोणत्याही परिस्थितीत करू नये.
- त्याच्या ज्याच्याकडून आपण कृत्रिम वेतन करून घेणार आहोत त्याच्या कामावर आपला पूर्ण विश्वास असावा व वारंवार त्यामध्ये बदल न करता एकाच पशुवैद्यकाकडून किंवा सेवादात्याकडून कृत्रिम रेतन करून घ्यावे. जेणेकरून काही दोष असेल तर त्याचे निदान करून त्यावर योग्य उपचार करता येतील किंवा इतरांकडून मार्गदर्शन घेता येईल.
- कृत्रिम रेतनानंतर अनेक वेळा सौम्य प्रमाणात रक्तस्त्राव होतो जो नैसर्गिक आहे त्याबाबतीत काळजी करू नये व रक्तस्राव झाल्यानंतर मात्र कृत्रिम वेतन करून घेऊ नये.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: वाढवायचे असेल पशुधनापासून उत्पन्न तर अवश्य करा कृत्रिम रेतन