आता बऱ्याच गोठ्यात पशुपालक शेतकऱ्यांनी दूध काढण्यासाठी मशीन घेतल्या आहेत. परंतु काही पशुपालाकांकडे अजूनही हाताने दूध काढले जाते दरम्यान आपण स्वच्छतेचे नियम पाळले नाही तर दूध बऱ्याच वेळी वासावर जाण्याची समस्या येते.
हाताने दूध काढताना व एकूणच दूध काढण्याच्या प्रक्रियेत व गोठ्याची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया.
१) गोठा कसा स्वच्छ ठेवाल?
- गोठा स्वच्छ असला पाहिजे. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी.
- दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये.
- गोठा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुवावा, त्यामुळे धूळ उडणार नाही.
- जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत भिंतीला चुना लावावा त्यामुळे गोठा जंतूविरहित राहतो.
- गोमूत्र व पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना असावी.
- गोठ्याबरोबर शेषखड्डा करून त्यात मलमूत्र साठवावे, त्यामुळे डास होणार नाहीत.
२) जनावरांची स्वच्छता कशी ठेवाल?
- दुधाची धार काढण्यापूर्वी जनावरांस पाण्याने स्वच्छ धुवावे.
- त्यानंतर शिफारशीत जंतुनाशकाच्या द्रावणाने कास व कासेजवळील भाग, सड स्वच्छ धुवावेत.
- कोरड्या कापडाने कास पुसून घ्यावी. जेणेकरून कास व कासेच्या भागातील बारीक केस, धूळ दुधात पडणार नाही.
३) दूध काढणाऱ्या व्यक्तीची स्वच्छता कशी ठेवाल?
- दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ व निरोगी असणे आवश्यक आहे.
- त्याची नखे वाढलेली नसावीत, त्याचे कपडे स्वच्छ असावेत.
- दूध काढण्यापूर्वी त्या व्यक्तीने साबण किंवा सोड्याने हात स्वच्छ धुवावेत.
- धार काढताना शिंकणे, थुंकणे, खोकणे, तंबाखू खाणे इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात.
- आजारी किंवा जखमा असलेल्या जनावरांचे दूध वेगळ्या भांड्यात अगर शेवटी काढावे.
४) दुधाच्या भांड्यांची स्वच्छता कशी ठेवायची?
- दूध खराब होण्याचे किंवा प्रत खालावण्याचे प्रमुख कारण म्हणजे भांड्यांमुळे रोगजंतूंची मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
- हे टाळण्यासाठी भांडी प्रथम थंड पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर गरम पाण्यात सोडा टाकून धुवावीत.
- धार काढण्याच्या बादल्या, किटल्या, चरव्या, कॅन यांना कमीत कमी कोपरे असावेत.
५) दूध कसे काढावे?
- सर्वसाधारणपणे सडाच्या भोवती चार बोटे लावून अंगठा दुमडून दूध काढतात त्यामुळे सडांना इजा होण्याची, कासदाह होण्याची शक्यता अधिक असते.
- याउलट पूर्ण हाताचा वापर ही सर्वात योग्य व चांगली पद्धत आहे.
- यामध्ये अंगठा न दुमडता पाचही बोटांत (मुठीत) सड पकडून धारा काढल्या जातात.
६) दूध काढल्यानंतर कशी घ्याल काळजी?
- दूध काढल्यानंतर स्वच्छ गाळणीने गाळून घ्यावे, यामुळे दुधातील घाण, कचरा वेगळा होतो व प्रत राखण्यास मदत होते.
- दूध उन्हाळ्यात बर्फात व हिवाळ्यात थंड पाण्यात साठवून लवकरात लवकर संकलन व शीतकेंद्रात पाठवावे.
- तसेच दुधाची वाहतूक करणारे टँकर निर्जंतुकीकरण मिश्रणाने स्वच्छ करावेत व ते वातानुकूलित असावेत.
अधिक वाचा: Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय