कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शेतकरी शास्त्रज्ञ मंच घेण्यात येतो. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचा ९७ वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच हा आज सोमवार दिनांक ०१ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाला.
यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. जी.एम. वाघमारे, प्रभारी अधिकारी, फळबाग संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीगनर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ.ए.एस. जिंतुरकर, विषय विशेषज्ञ पशु व दुग्धशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, छ. संभाजीनगर होते. तसेच यावेळी प्रा. जी.बी.यादव, विषय विशेषज्ञ व प्रा. ए.डि. निर्वळ, श्री शिवा काजळे यांची उपस्थिती होती.
यावेळी दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पशुधन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ.ए.एस. जिंतुरकर यांनी संगितले की, सद्यःस्थितीत उन्हाळयात जनावरांना दिवसभर लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी त्या चार्याची समान विभागणी करुन ३ ते ४ वेळेत चारा जनावरांना द्यावा.तसेच चा-याची नासाडी कमी करण्यासाठी चारा कुटटीचा वापर करावा. चारा कुटटी न करता दिल्यास चा-याची ३३ टक्के नासाडी होते. हिरवा चारा वाळलेला चारा याचे एकत्रित मिश्रण करुन गुळ व मिठाच्या पाण्याचे द्रावण त्यावर शिंपडावे.
तसेच प्रति जनावरांस शरीर वजनानुसार २० ते ५० ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा. घामावाटे सोडिअम, क्लोराईड क्षार कमी होत असल्याने प्रति जनावर दररोज शरीर वजनानुसार २५ ते ५० ग्रॅम आयोडिनयुक्त मिठ द्यावे. तसेच दुधाळ जनावरांच्या आहारात ताक, गुळ, मीठ, क्षार हे ही घटक दररोज योग्य प्रमाणात द्यावे.
प्रामुख्याने जनावरास ऊसाचे वाडे, वाळलेले ऊस, ऊसाचे पाने एकुण चार्याच्या ३० टक्के पेक्षा अधिक प्रमाणात देवु नये. तसेच ऊस कुट्टी, ऊस पाने यावर १ टक्क चुन्याची निवळी शिंपडुन मगच पशुंना खायला द्यावी. उन्हाळयात पशुंना उष्माघाताचा त्रास होत असल्याने पशुना थंड वातावरणासाठी ओल्या फडक्यांचा वापर करावा. असे आवाहन डॉ. ए.एस. जिंतुरकर यांनी यावेळी केले.