धाराशिव : दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे पशुधनाची भूक मंदावून रोगप्रतिकार शक्ती कमी होते. यातून पशुधन लहान-मोठ्या आजारांना बळी पडते. सोबतच दूध उत्पादनातही घट येते. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी पशुधनास कडाक्याच्या उन्हात चरण्यासाठी सोडू नये. शक्यतो, स्वच्छ व हवेशीर गोठ्यात पशुधनास बांधावे आणि सकाळी व सायंकाळी कमी उन्ह असताना चरण्यासाठी सोडावे, असे पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
उष्ण हवामानामध्ये पशुधनाचा भरपूर पाणी पिण्याकडे कल असतो. कोरडा चारा न खाणे, हालचाल मंदावणे, सावलीकडे स्थिरावणे, शरीराच्या तापमानात वाढ होणे, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, दूध उत्पादनात कमी येणे, प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे आदी बाबी जनावरांमध्ये आढळून येतात. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी शक्यतो जनावरांना सकाळी व संध्याकाळी उन्ह कमी असताना चरण्यास सोडावे. उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चारा टाकावा. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे त्यांना गाींपेक्षा जास्त त्रास होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी. कडक उन्हात पाण्याच्या लोखंडी हौदामधील गरम झालेले पाणी पाजणे टाळावे. मृत जनावरांची विल्हेवाट नियमित चराऊ कुरणाच्या ठिकाणी करू नये. जनावरे दाटीवाटीने, गर्दीने जवळ बांधू नयेत असा सल्लाही दिला आहे.
उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे माणसांसोबतच पशुधनासही चटके बसत आहेत. वाढत्या तापमानाचा पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आवश्यक उपाययोजना कराव्यात.- डॉ. यतीन पुजारी, जिल्हा पशुधन विकास अधिकारी.
काय करावे?
■योग्य पशुआहार, मुरघासाचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यातसुद्धा आवश्यक दूध उत्पादन मिळवणे शक्य आहे.
■पशु खाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलोक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे. दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावीत.
■ गोठ्यांची उंची जास्त असावी. जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला शक्यतो पांढरा चुना / रंग लावावा, तसेच त्यावर पालापाचोळा / तुराट्या / पाचट टाकावे. ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल. परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत.
■गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे,स्प्रींक्लर्स यासोबत पंख्याचा वापर करावा.
काय करू नये?
उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पशुधनाच्या चाऱ्यामध्ये एकदम बदल करू नये. सोबतच गोठ्यात पशुधनास दाटीवाटीने बांधणे टाळावे. गोठा तयार करताना त्याची उंची कमी ठेवू नये. गोठा उंच असल्यास हवा खेळीत राहते.
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक म्हशी साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी, तलाव, पाणथळे यात बसविल्या जातात. यातून म्हशीचे शरीर तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरी अस्वच्छ पाणी, वर चमकणारे उन रोगप्रसार यांच्या दृष्टिने चुकीचा मार्ग अवलंब होतो. त्यामुळे याबाबी टाळाव्यात.