आपल्याकडे सध्या दूध व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. यात मुख्य कारण ठरले ते म्हणजे होलस्टीन फ्रिजियन (एच एफ) गाई. पारंपरिक देशी गोवंशापेक्षा जास्तीत जास्त दूध उत्पादन या गाईंपासून मिळायला लागल्याने अनेकांनी संकरीत गायींचे गोठे उभारले. ज्यातून एकाच्या दोन करत करत आज जवळपास सर्वत्र या एच एफ गाई पसरल्या आहेत.
दहा गाईंचे दूध उत्पादन एका गाई पासून किंबहुना कमी खर्चात अधिक नफा असे बिरुद घेऊन आलेल्या या गाई मात्र व्यवस्थापनात अधिक खर्चिक असल्याचे कालांतराने दिसून आले. सध्या सर्वत्र भीषण पाणी टंचाई, चारा टंचाई आहे. याचा परिणाम या एच एफ गायींच्या दूध उत्पादनावर देखील झालेला दिसून येतो. त्यासोबतच अनेकांच्या मनात हा प्रश्न देखील घोंघावत असेल की या एच एफ गाई का एवढ्या अधिक प्रमाणात पाणी पित असतील ते त्याचे उत्तर आहे वाढलेले तापमान.
उष्णतेचा ताण सहन करण्याची नैसर्गिक कुठलीही क्षमता नसल्याने या गाई अधिक प्रमाणात पाणी पितात असे पशुवैद्यकीय तज्ञ सांगतात.
या एच एफ गायींना दिवसाकाठी किती पाणी लागते?
एका चार जणांच्या परिवाराचे दिवसाकाठी लागणारे पिण्याचे पाणी एच एफ गाईला लागते. त्यामुळे संकरीत गाईला किती पाणी दिवसाकाठी लागते हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. तसेच याचे उत्तर कदाचित मिळणे देखील अवघड आहे. कारण वैरण पचविण्यापासून ते शरीराच्या गरजेनुसार प्रत्येकाला पाणी हवे असते. वजन आणि वय यानुसार यात काहींसा फरक नक्कीच होईल. मात्र पाणी हे शरीरसाठी गरजेचे असून ते गरजेनुसार द्यायलाच हवे. यात मोजमाप करून चालणार नाही.
आपल्या राज्यातील प्रदेशनिहाय देशी गाई
प्रदेशानुसार तिथल्या वातावरणीय बदलांना अनुसरून आपल्याकडे देशी गाई होत्या. ज्यात आपल्या चपळ आणि आकर्षक देखणी बांध्यासाठी प्रसिद्ध असलेली पश्चिम महाराष्ट्रची शान खिल्लार गाय. मराठवाड्याच्या उष्ण तापमानात तग धरणारी देवणी गाय. अकोले (जि. अहमदनगर) ते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पर्यंतच्या डोंगराळ भागातील चढ उतार सोबत अधिक पाऊस सहन करण्याची क्षमता असलेली तेलकट कातड्यांची डांगी गाय. कोकणाच्या चढ उतार भागांना पूरक असलेली कोकण कपिला गाय.
मात्र यांचे कमी दूध उत्पादन आणी प्रजनन योग्य परिपूर्ण होण्यासाठी लागणारा ३ ते ४ वर्षांचा कालावधी यामुळे या गाई पशुपालकांच्या दावणीतून हद्दपार झाल्या आहे.
हेही वाचा - पशुपालकांनो सावडीनुसार नको; जनावरांच्या पाण्याचे असे असावे काटेकोर नियोजन