Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी

World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी

World Fisheries Day: Many opportunities for businessmen from fisheries business | World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी

World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी नवनवीन थीम द्वारे साजरा करण्यात येतो. मागील वर्षी २०२३ ची थीम लहान मच्छीमारांकरिता मत्स्यपालनासाठी सक्षम वातावरण धोरण राबवणे अशी होती. जाणून घेऊया सविस्तर (World Fisheries Day)

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी नवनवीन थीम द्वारे साजरा करण्यात येतो. मागील वर्षी २०२३ ची थीम लहान मच्छीमारांकरिता मत्स्यपालनासाठी सक्षम वातावरण धोरण राबवणे अशी होती. जाणून घेऊया सविस्तर (World Fisheries Day)

शेअर :

Join us
Join usNext

World Fisheries Day : जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी नवनवीन थीम द्वारे साजरा करण्यात येतो. मागील वर्षी २०२३ ची थीम लहान मच्छीमारांकरिता मत्स्यपालनासाठी सक्षम वातावरण धोरण राबवणे अशी होती. ती शाश्वत मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनामध्ये लहान-मोठ्या मच्छिमारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देते.

लहान मासेमारी करणारे जे सहसा पारंपारिक आणि कमी-प्रभावी मासेमारी पद्धती वापरतात, ते स्थानिक अन्न सुरक्षा आणि उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यांच्याकडे सागरी संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी मोल्यवान ज्ञान आणि कौशल्य देखील आहे.

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन का साजरा केला जातो?

मत्स्यसंपदा शाश्वत स्वरुपात वृध्दींगत करणे हा उद्देश ठेवून दर वर्षी २१ नोव्हेंबर हा दिन जागतिक मत्स्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. मत्स्यपालनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकरी संस्था/संघ/भागधारक यांच्या दृढ ऐक्याचे प्रदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. सदर जागतिक मत्स्य दिनाचे औचित्य साधून राज्यात मच्छिमार बांधवाची जनजागृती करणे, मच्छिमार बांधवांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे व मत्स्यव्यवसाय क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येऊन ''जागतिक मत्स्य दिन'' साजरा करण्यात येतो.

जागतिक मत्स्यव्यवसाय दिनाचा इतिहास

सन १९९७ मध्ये ''वर्ल्ड फोरम ऑफ फिश हार्वेस्टर्स अँड फिश वर्कर्स'' यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली. यामध्ये १८ देशांच्या प्रतिनिधींसह ''जागतिक मत्स्यपालन मंच''ची स्थापना झाली आणि शाश्वत मासेमारी पद्धत आणि धोरणांच्या जागतिक आदेशाचे समर्थन करणाऱ्या घोषणेवर स्वाक्षरी केली.

मत्स्यव्यवसायाच्या समस्यांचे निराकरण करण्याची वाढती गरज ओळखून, UN च्या अन्न आणि कृषी संघटना(FAO) आणि WFF यांनी संयुक्तपणे मत्स्य व्यवसायाला समर्पित आंतरराष्ट्रीय दिवस स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव २००३ मध्ये FAO महासभेने स्वीकारला, अधिकृतपणे २१ नोव्हेंबर हा जागतिक मत्स्य व्यवसाय दिन म्हणून साजरा करणे बाबत निर्णय झाला. मत्स्यव्यवसाय दिन साजरा करणेच्या निर्णयामुळे, या दिवशी अन्न सुरक्षा पोषण आणि उपजीविकेमध्ये मत्स्यपालनाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागतिक जागरूकता निर्माण करणे, शाश्वत मत्स्यपालन व्यवस्थापन पद्धतींना चालना देणे, अति मासेमारी, अवैध मासेमारी आणि हवामान बदलाच्या परिणामांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.

जागतिक मत्स्यव्यवसाय दिनाचे महत्त्व

जागतिक अन्नसुरक्षा आणि पोषणामध्ये मत्स्यपालन महत्वपूर्ण भूमिका बजावते जगभरातील सुमारे ३ अब्ज लोकांसाठी २० टक्के पेक्षा जास्त प्राणी प्रथिनांचे सेवन प्रदान करते. तथापि, अतिमासेमारी, हवामानातील बदल आणि प्रदूषणामुळे मत्स्यपालनाच्या शाश्वततेला, सागरी परिसंस्था आणि मच्छीमारांच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. जागतिक मत्स्यव्यवसाय दिन या अव्हानांबाद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मासेमारी समुदायांच्या गरजांनुसार संरक्षण संतुलित करणाऱ्या जबाबदार मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.

जागतिक मत्स्यदिनानिमित्य साजरे करण्यात येणारे कार्यक्रम

जागातील विविध देशात मत्स्यपालन, मत्स्यपालक आणि इतर भागधारकांचे योगदान आणि यश साजरे करण्यासाठी तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि न्याय्य विकासासाठी
वचनबध्दतेला बळकटी देण्यासाठी विविध जनजागृती/ रॅली/ सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात. भारत सरकार यांच्याद्वारे २०२३ वर्षी ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया २०२३ आयोजित करण्यात आलेले होते. या दोन दिवसीय कार्यक्रम २१ आणि २२ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादमधील गुजरात सायन्स सिटी येथे झाला. दोन दिवसीय कार्यक्रमाची थीम ''सेलिब्रेट द फिशरीज अँड ॲग्रीक्लचर वेल्थ'' अशी होती.  

महाराष्ट्रातील मत्स्यदिनांचे महत्त्व

महाराष्ट्रात आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच राज्यातील विविध जिल्हा मत्स्य व्यवसाय विभाग कार्यालय/ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था/ कोळी बांधव / मत्स्य विज्ञान महाविद्यालय/ केंद्रीय मत्स्य संस्था/ कृषी विज्ञान केंद्र / खाजगी मत्स्यबीज उत्पादक/  मत्स्यउत्पादक आदी द्वारे विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे दरवर्षी साजरे करण्यात येते. सदर बाबतचे महाराष्ट्र शासनाने जागतिक मत्स्यदिनाचे महत्त्व ओळखून समजून राज्यात मत्स्यव्यवसायाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व शाश्वत मासेमारी होण्याच्या दृष्टीने मत्स्यदिन साजरा करण्या करिता ९ ऑगस्ट २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

खालील प्रमाणे जागतिक मत्स्यदिन साजरा करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत.

* राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांचा मेळावा आयोजित करणे, मत्स्य व्यवसाय विभागातील विविध योजनांबाबत मच्छीमारांच्या सभा घेणे, प्रतिबंधित कसे मासेमारीबद्दल माहिती देणे.

* प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना तसेच मच्छीमारांशी संबंधित सर्व योजनांची बॅनर्स, माहिती पुस्तिका आदीद्वारे प्रसिद्धी करणे .

* मच्छीमारांना तांत्रिक मार्गदर्शनाकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

* विविध योजनांमार्फत विकसित करण्यात आलेल्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करणे.

* ई-श्रम कार्ड व किसान क्रेडिट कार्ड बाबत बँकांना पाचारण करून चर्चासत्र व कार्ड वाटप शिबिरे आयोजित करणे.

* मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य/ विभाग/ जिल्हास्तरावर विविध क्षेत्रात मत्स्यसंवर्धक/ मच्छीमार/ मत्स्यकास्तकार आदी यांना सर्वोत्कृष्ट जिल्हा (भूजल/ सागरी) सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था संघ सदस्य शेतकरी उत्पादक संस्था सर्वोत्कृष्ट मत्स्यसंवर्धक, सर्वोत्कृष्ट शासकीय / खाजगी मत्स्यबिज उत्पादन/ संवर्धन केंद्र, सहायता समूह, सर्वोत्कृष्ट वैयक्तिक उद्योजक, सर्वोत्तम अभिनव कल्पना/ तंत्रज्ञान करणारा प्रकल्प, सर्वोत्कृष्ट शासकीय क्षेत्रातील अधिकारी/ कर्मचारी यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह आदी द्वारे सन्मानित करणे.

* केंद्र शासन/ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या ॲपचा प्रसार करणे.

* समुद्रातील घोस्ट नेट काढण्याचे, सागरी स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलनाचे कार्यक्रम घेणे, कांदळवन दुर्लभ प्रजाती मासे व कासव संरक्षणबद्दल प्रबोधन करणे.  

* मत्स्य पर्यटनास प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. (नौका नयन स्पर्धा, सी-फूड फेस्टिवल, सागरी खाद्य महोत्सव, गळ स्पर्धा , ॲंगलिंग आदी)

* मत्स्यदिनानिमित्त मच्छीमार तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध व्यक्ती यांना आमंत्रित करुन चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा, मनोरंजनात्मक कार्यक्रम व स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करणे.  

भारताचे मत्स्यव्यवसायिक क्षेत्र

मत्स्यव्यवसाय क्षेत्राला एका सूर्योदय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ज्यामध्ये समाजातील असुरक्षित घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणाद्वारे न्याय आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. जागतिक मत्स्य उत्पादनात ८ टक्के वाटा असलेल्या, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक, दुसरा सर्वात मोठा मत्स्यपालन उत्पादक, सर्वात मोठा कोळंबी उत्पादक आणि चौथा सर्वात मोठा समुद्री खाद्य निर्यात करणारा देश आहे.

भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्राने सातत्यपूर्ण वाढ अनुभवली आहे आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय ही प्रगती टिकून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMSSY) द्वारे २२ दशलक्ष मॅट्रिक टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करणे एवढेच नव्हे तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात निर्यात १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे.  देशातील ३ कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालकांना शाश्वत उत्पन्न आणि उपजीविका प्रदान करण्यात या क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भूजलाशयीन मत्स उत्पादन, निर्यात आणि मत्स्यपालन, विशेषतः भूजलाशयीन मत्स्यपालनात लक्षणीय वाढ दिसून आली आहे, ज्यामुळे एकूण मत्स्य उत्पादनात ७०% पेक्षा जास्त योगदान आहे. हे यश केंद्र सरकार, राज्य/ केंद्रशासित प्रदेश आणि विविध क्षेत्रांतील लाभार्थी यांच्यातील सहयोगी प्रयत्नांमुळे प्राप्त झाले आहे.

- किरण मा वाघमारे, (सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, पुणे.)

Web Title: World Fisheries Day: Many opportunities for businessmen from fisheries business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.