खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शासन विम्याचा प्रीमियम शासन भरणार आहे त्यामुळे एक रुपयात रब्बीतही शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ही डेडलाइन देण्यात आलेली आहे. यंदा किमान एक लाख शेतकरी खातेदार या योजनेमध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास रब्बी पिकांना योजनेत संरक्षण मिळते. यंदा जमिनीत आर्द्रता नसल्याने पेरण्यांची मंदगती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होऊ शकतो. यामध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सहभाग ऐच्छिक आहे. खातेदाराने वैयक्तिक कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी योजनेत सहभाग घेऊ शकतात. योजनेत गहू, हरभरा, कांद्यासह इतर पिकांचा समावेश आहे.
योजनेत यावर्षीपासून शेतकरी हिस्सा राज्य शासन भरणा करणार आहे. त्यामुळे फक्त एक रुपयात शेतकरी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवू शकतो. या वर्षासाठी जोखीमस्तर हा ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. मृत व्यक्तीच्या नावे विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
रब्बी हंगामासाठी पिकानुसान मुदत देण्यात आली आहे. यामध्ये गहु, कांदा, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना विमा काढावा लागणार आहे. उन्हाळी भुइमूगासाठी ३१ मार्चपर्यंत पिक विमा काढता येणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाने यावेळी वाढविली जोखमीची व्याप्ती
पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, पीक, लावणीपूर्व नुकसान उत्पादनात ७५ टक्क्यांपेक्षा कमी येत असल्यास, तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस, यामुळे कापणी, काढणीनंतर सुकविण्यासाठी शेतात. पसरविलेले पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्त्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते.
शेतकऱ्यांनी विमा काढावा
रब्बी हंगामात केवळ एक रुपयात नोंदणी करता येते. सहभाग घेण्यासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या बाबी महत्त्वाच्या
- बाधित पीक किंवा बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्याच्या ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. त्यानंतर कंपनीद्वारा पंचनामे करण्यात येणार आहेत.
- सामूहिक सेवा केंद्रधारकाकडून प्रति अर्ज १ रुपयाचा भरणा करून विमा योजनेत सहभाग घेता येतो. यापेक्षा जास्त रकमेची मागणी झाल्यास जवळच्या कृषी विभागाकडे याची माहिती द्यावी.