Join us

नाशिकमधील १३ धरणे तहानलेलीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 2:30 PM

निम्म्या प्रकल्पांच्या पातळीत वाढ : दारणा १८, तर गंगापूर १२ टक्के जास्त

नाशिक जिल्ह्यातील चार तालुके वगळता अन्य तालुक्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात असलेली एकूण २४ लहान-मोठ्या धरणांपैकी ११ पातळी मागील वर्षीच्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेने वाढल्याने काहीसा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे; मात्र उर्वरित १३ धरणे अद्यापही तहानलेली असल्याने त्या भागातील नागरिक चिंतित आहेत. पावसाळ्याचा हा तिसरा महिना सुरू असला तरीही जिल्ह्यातील एकूण ६७ गावे व ३९ वाडीवस्तींची तहान ५६ टँकरद्वारे भागविली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी कमी राहिले आहे. मागील आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच पुढील आठवड्यापर्यंत हवामान खात्याने नाशिकमध्ये पावसाचा अंदाजही वर्तविलेला नाही. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ हे चार तालुके तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही. या तालुक्यांमध्ये अधूनमधून पावसाची हजेरी सध्या सुरूच आहे. शहरात मात्र सोमवारी वगळता आकाश पूर्णतः निरभ्र राहिले व स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याचा अनुभव नाशिककरांनाआला. 

नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील चार लहान-मध्यम प्रकल्पांचा जलसाठा हा मागील वर्षी ऑगस्टमध्ये ८३ टक्के इतका होता, सध्या तो ७२ टक्क्यांपर्यंत आहे. गंगापूर या मोठ्या वर्गातील धरणात सध्या ४ हजार ८९५ अन्य दलघफू इतका साठा असून धरण ८७ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे धरण ७५ टक्के भरले होते.

गिरणा खोऱ्यातील २ धरणे १००%

गिरणा खोयातील पाचपैकी दोन मध्यम धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित चणकापूर ६७, पुनद ५१ टक्के, गिरणा ३५ टक्के भरले आहेत. नागासाक्या, माणिकपुंज धरण शून्यावर आहे. धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील फारसा दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. चणकापूर हे या समूहाचे मोठे धरण आहे.

टॅग्स :धरणनाशिकपाणीपाणीकपातशेतीपाऊसमोसमी पाऊस